"माझ्या आईनं मोठ्या विश्वासानं..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

राहुल गांधीनी आज रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला.
राहुल गांधी
राहुल गांधी ANI
Published on

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघात काँग्रेसनं आज आपले उमेदवार जाहीर केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. राहुल गांधींनी यावेळी अमेठी मतदारसंघातून अर्ज न भरता काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर अमेठीमधून किशोरी लाल यांनी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींनी भावनिक पोस्ट केली. ते म्हणाले की, "रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरणं माझ्यासाठी भावनिक क्षण होता. माझ्या आईनं मोठ्या विश्वासानं माझ्या कुटूंबाची कर्मभूमी माझ्याकडे सोपवली आहे." संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठीच्या लढाईत साथ देण्याचं भावनिक आवाहनही त्यांनी जनतेला यावेळी केलं.

राहुल गांधींची भावनिक पोस्ट:

राहुल गांधी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, "रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरणं माझ्यासाठी भावनिक क्षण होता. माझ्या आईनं मोठ्या विश्वासानं माझ्या कुटूंबाची कर्मभूमी माझ्याकडे सोपवली आहे आणि तिच्या सेवेची मला संधी दिली आहे. अमेठी आणि रायबरेली माझ्यासाठी वेगळ्या नाहीत, दोन्हीही माझं कुटूंब आहे आणि मला आनंद आहे की गेल्या ४० वर्षांपासून या क्षेत्रात सेवा करत असलेले किशोर लाल अमेठीतून पार्टीचं प्रतिनिधित्व करतील. अन्यायाविरूद्ध चाललेल्या न्यायाच्या लढाईत मी माझ्या आपल्या लोकांचा आशीर्वाद मागत आहे. मला विश्वास आहे की, संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या लढाईत आपण सर्वजण माझ्यासोबत आहात."

प्रियंका गांधींनी व्यक्त केली कृतज्ञता:

प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधी यांची रायबरेलीमधून उमेदवारी हा भावनिक क्षण असल्याचं म्हटलं आहे. यावर त्यांनी एक पोस्टही लिहिली. त्या म्हणाल्या की, "आमचं कुटूंब दिल्लीमध्ये अपूर्ण आहे. ते रायबरेलीला आल्यावर पूर्ण होतं. एक असं कुटूंब, जे प्रत्येक चढ-उतार, सुख-दु:ख, संकट-संघर्षात खडकाप्रमाणे आमच्या पाठीशी उभं राहिलं. हे आपुलकीचे आणि विश्वासाचं नातं आहे."

हक्क वाचवण्यासाठी लढा : प्रियंका गांधी

त्यांनी लिहिले की, "येथील लोकांकडून आम्हाला जेवढं प्रेम, जिव्हाळा आणि आदर मिळाला ते अमूल्य आहे. कौटुंबिक नात्याचे सर्वात मोठं सौंदर्य हे आहे की तुम्हाला कितीही वाटलं तरी तुम्ही त्यांच्या प्रेमाचे ऋण कधीच फेडू शकत नाही. या कठीण काळात जेव्हा आपण देशाची लोकशाही, संविधान आणि लोकांचे हक्क वाचवण्यासाठी लढा देत आहोत, तेव्हा या लढ्यात आपलं संपूर्ण कुटुंब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आज हजारो कुटुंबीयांच्या उपस्थितीत राहुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला."

logo
marathi.freepressjournal.in