'कुत्र्याने बिस्किट खाल्ले नाही, तर तेच बिस्किट कार्यकर्त्याला दिले', राहुल गांधींच्या 'त्या' Video वरून भाजपची टीका

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
'कुत्र्याने बिस्किट खाल्ले नाही, तर तेच बिस्किट कार्यकर्त्याला दिले', राहुल गांधींच्या 'त्या' Video वरून भाजपची टीका
Published on

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानचा हा व्हिडिओ असून राहुल यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या प्लेटमधील बिस्किट कार्यकर्त्याला खाऊ घातल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह भाजपचे नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींना चांगलेच धारेवर धरले आहे.

हा व्हिडिओ झारखंडमधील भारत जोडो यात्रेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. यात राहुल गांधींना अनेक कार्यकर्त्यांनी घेरल्याचे दिसत आहे. कारमध्ये उभे असलेले राहुल गांधी त्यांच्या शेजारी असलेल्या आपल्या पाळीव कुत्र्याला बिस्किट खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात. कुत्रा ते खात नाही. मग राहुल एका क्षणासाठी ते बिस्किट पुन्हा प्लेटमध्ये ठेवतात. त्याचवेळी काँग्रेसचा एक कार्यकर्ता राहुल गांधींशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि हस्तांदोलनासाठी हात पुढे करतो. पण, हस्तांदोलनाआधी राहुल गांधी तेच बिस्किट त्या कार्यकर्त्याच्या हातात देतात आणि नंतर हस्तांदोलन करतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून राहुल गांधी यांच्या या कृत्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

असा पक्ष नामशेष होणे स्वाभाविक - मालवीय

"काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यांशी केली होती आणि इथे राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत आहेत आणि कुत्र्याने खाल्ली नाही तेव्हा त्यांनी तीच बिस्किटे आपल्या कार्यकर्त्याला दिली", अशी टीका भाजपचे नेता अमित मालवीय यांनी केली आहे. "एखाद्या पक्षाचे अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांना कुत्र्यांसारखे वागवत असतील, तर असा पक्ष नामशेष होणे स्वाभाविक आहे", असेही त्यांनी म्हटले.

संपूर्ण कुटुंब मला ते बिस्कीट खायला लावू शकले नाही

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही या व्हायरल व्हिडिओवरून राहुल गांधीवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. पल्लवी सीटी नावाच्या एका युजरने राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर, "पल्लवी जी, फक्त राहुल गांधीच नाही तर संपूर्ण कुटुंब मला ते बिस्किट खायला लावू शकले नाही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसचा राजीनामा दिला", अशी प्रतिक्रिया सरमा यांनी दिली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून सोमवारी चौथ्या दिवशी पुन्हा सुरू झाली. रविवारी जिल्ह्यातील सिद्धू-कान्हू मैदानावर रात्रीचा मुक्काम केल्यानंतर ही यात्रा सोमवारी सकाळी महात्मा गांधी चौकातून पुन्हा निघाली.

logo
marathi.freepressjournal.in