

नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील, असे भाकित लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी वर्तवले आहे.
खासदार राहुल गांधी यांनी 'इन्स्टाग्राम' वर एक पोस्ट शेअर केली. यात, राहुल गांधी यांनी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, 'डॉलरच्या तुलनेत रुपयाचे १०० रुपयांच्या दिशेने होणारे अवमूल्यन आणि औद्योगिक इंधनाच्या किमतींमधील मोठी वाढ ही केवळ आकडेवारी नसून, येऊ घातलेल्या महागाईची स्पष्ट चिन्हे आहेत.'
ते म्हणाले, 'सरकार याकडे सामान्य बाब म्हणून दुर्लक्ष करू शकते, पण वास्तव हे आहे की, उत्पादन आणि वाहतूक महाग होईल, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सर्वाधिक फटका बसेल, दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढतील आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा निधी अधिक वेगाने बाहेर जाईल, ज्यामुळे शेअर बाजारावर दबाव वाढेल.' याचाच अर्थ प्रत्येक कुटुंबाच्या खिशावर याचा थेट आणि गंभीर परिणाम होणारच आहे. आणि निवडणुकांनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतीही वाढवल्या जातील.