राहुल, प्रियांका स्थानबद्ध; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक, ५० खासदारांसह २५० जण पोलिसांच्या ताब्यात

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘इंडिया’ आघाडीने निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे मोर्चा काढला. मोर्चा रोखल्यानंतर आकाशवाणी भवन परिसरात आठ तासांहून अधिक धरणे आंदोलन केल्याप्रकरणी राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह सुमारे २५० जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.
राहुल, प्रियांका स्थानबद्ध; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक, ५० खासदारांसह २५० जण पोलिसांच्या ताब्यात
राहुल, प्रियांका स्थानबद्ध; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक, ५० खासदारांसह २५० जण पोलिसांच्या ताब्यात
Published on: 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘इंडिया’ आघाडीने मंगळवारी संसद मार्गावरून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे मोर्चा काढला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढण्यापासून रोखल्यानंतर आकाशवाणी भवनाच्या परिसरात आठ तासांहून अधिक काळ धरणे आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह सुमारे २५० जणांना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री उशिरा राहुल-प्रियांका यांच्यासह अन्य नेत्यांची सुटका करण्यात आली.

ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना किंग्जवे कॅम्प येथील न्यू पोलीस लाइन्समध्ये नेण्यात येत होते. आकाशवाणी भवनाचा परिसर रिकामा करताना पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे खासदार व नेते के. सी. वेणुगोपाल, पवन खेरा, के. सुरेश, अमरिंदर सिंह राजा वडिंग आणि इम्रान प्रतापगढी यांना बळाचा वापर करून बाहेर काढले. ज्ञानेश कुमार यांना भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी ठिय्या मांडला होता.

पोलिसांचा विरोध असतानाही राहुल, प्रियांका आणि काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी स्वागत कक्षाच्या प्रवेशद्वारातून आकाशवाणी भवनाच्या परिसरात प्रवेश केला. त्यानंतर ते तेथील एका झाडाखाली बसले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन विभागीय पोलीस उपायुक्त सचिन शर्मा घटनास्थळी दाखल झाले. मोर्च्यादरम्यान विरोधी पक्षांच्या खासदारांनी ज्ञानेश कुमार यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील चित्र असलेले फलक हातात घेतले होते. ‘भाजप है, सीईसी है’, ‘वोट चोर, गद्दी छोड़’ आणि ‘डेमॉक्रसी नॉट फॉर सेल’ अशा घोषणा देण्यात आल्या.

विशेष सघन मतदारयादी पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान मतदार नोंदणीसाठीच्या फॉर्म-६ मध्ये करण्यात आलेल्या कथित बदलांवरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फॉर्म-६ च्या सुधारित आवृत्तीला मंजुरी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, फॉर्ममध्ये बदल करण्यात आले आहेत का आणि ते कोणी अधिकृत केले, यासाठी निवडणूक आयोगाच्या नोंदी तपासणार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर निवडणूक आयोगावरील जनतेचा विश्वास कमी केल्याचा आरोप केला.

‘वोट चोरी’च्या आरोपांवरून राजीनाम्याची मागणी

यापूर्वी राहुल गांधी यांनी संसद मार्गावरील आकाशवाणी भवनाच्या परिसरात प्रवेश करून धरणे सुरू केले होते. निवडणूक आयोगाचे कार्यालय सुमारे ३०० मीटर अंतरावर असतानाही विरोधी पक्षांच्या खासदारांना तेथे मोर्चा काढण्यापासून पोलिसांनी रोखले होते. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आणि मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत कथित अनियमितता असल्याच्या माध्यमातील वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी हे आंदोलन केले. ‘वोट चोरी’च्या आरोपांवरून विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सुरक्षा बंदोबस्तावर राऊत यांचे प्रश्नचिन्ह

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोर्च्यासाठी करण्यात आलेल्या मोठ्या सुरक्षा बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘आम्ही खासदार आहोत, संसदेचे सदस्य आहोत आणि देशाचे नागरिकही आहोत. आम्हाला रोखण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्याची गरज काय? आम्ही शांततेने चालत जाणार आहोत. आमच्याकडे शस्त्रे नाहीत. ज्ञानेश कुमार यांनी जनतेची दिशाभूल केली असून त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही,’ असेही राऊत म्हणाले.

आठ तासांहून अधिक काळ धरणे

आकाशवाणी भवनाच्या परिसरातील धरणे आठ तासांहून अधिक काळ सुरू होते. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू केली आणि राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह सुमारे २५० जणांना ताब्यात घेतले. त्याआधी संसद मार्गावरील नीती आयोगाच्या कार्यालयाजवळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अन्य खासदारांना पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर विरोधी पक्षांचे नेते रस्त्यावरच ठिय्या देऊन बसले. राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून निषेध केला. प्रियांका गांधी यांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवण्यात आले; मात्र काही वेळाने त्या बसमधून उतरून राहुल गांधी यांच्यासोबत आकाशवाणी भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्या.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in