
नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मतदार यादीत लाखो मतदारांची नावे समाविष्ट झाल्याबद्दल संशय व्यक्त केला होता. तोच धागा पकडून राहुल गांधी यांनी शुक्रवारी महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार असल्याचे सांगत अनियमितता झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार (शरद पवार) सुप्रिया सुळे आणि शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांच्यासह घेतलेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा अधिक मतदान झाल्याचे सांगत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. त्यासोबतच निवडणूक आयोगाला काही सवाल केले आहेत. पाच वर्षांमध्ये हिमाचल राज्यातील लोकसंख्येइतके मतदार कसे वाढले, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रात आमची मते कमी झालेली नाहीत, तर भाजपची मते वाढली आहेत, असे ते म्हणाले.
कामठी विधानसभेत १.६३ लाख मते लोकसभेला काँग्रेसला मिळाली. विधानसभेलाही तितकेच मतदान झाले. मात्र, या मतदारसंघात ३५ हजार मते वाढली आणि ती सगळी भाजपच्या खात्यात गेली आणि भाजप निवडणूक जिंकली. अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात आमची मते कमी झाली नाहीत, भाजपची मते वाढली आहेत. जिथे भाजपचा स्ट्राइक रेट ९० टक्क्यांहून अधिक आहे तिथे मतदार वाढले आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला.
राहुल यांचे तीन मुद्दे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी गैरप्रकार केल्याचा दावा करताना राहुल गांधींनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. विधानसभा निवडणूक २०१९ ते लोकसभा निवडणूक २०२४ या पाच वर्षांत ३२ लाख मतदारांचा याद्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला. पण लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांत ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांत समाविष्ट झालेले मतदार आधीच्या पाच वर्षांतल्या मतदारांपेक्षा जास्त कसे, हे ३९ लाख मतदार कोण आहेत, संपूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये ३९ लाख मतदार आहेत आणि तेवढे नवे मतदार महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये समाविष्ट झाले आहेत, असा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात विरोधी पक्षांना जितक्या मतदारांनी मतदान केले त्यांची संख्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अजिबात कमी झालेली नाही. दुसरीकडे भाजपला लोकसभेत १.९ लाख मते मिळाली होती. विधानसभेत त्यांना १.७५ लाख मते मिळाली. यातले बहुतेक मतदार हे नव्याने समाविष्ट झालेल्या ३५ लाख मतदारांमधील आहेत. हे फक्त एका मतदारसंघातच नाही तर अनेक मतदारसंघांमध्ये दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मतदारसंघांमध्ये हे दिसून आले आहे, असा दावा राहुल गांधींनी केला आहे.
काळेबेरे असल्याने आयोगाकडून उत्तर नाही!
यावेळी राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या देण्याची मागणी केली आहे. आम्ही निवडणूक आयोगाला हे सांगत आलो आहोत की, आम्हाला राज्यातील मतदार याद्या हव्या आहेत. त्यातील मतदारांची नावे, पत्ते आणि छायाचित्रे हवी आहेत. आम्हाला लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्या हव्यात. आम्हाला हे पाहावयाचे आहे की, हे नवे मतदार कोण आहेत, अनेक मतदारांची नावे हटवण्यात आली. अनेक मतदारांची नावे एका बुथमधून दुसऱ्या बुथमध्ये समाविष्ट करण्यात आली. यातील बहुतेक मतदार हे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक गटातले होते, असेही ते म्हणाले. आम्ही यासाठी निवडणूक आयोगाला वारंवार विनंती केली आहे. पण त्यांनी आम्हाला उत्तर दिलेले नाही. यात काहीतरी काळेबेरे आहे म्हणून ते उत्तर देत नाहीत. मी कोणताही आरोप करत नाही, मी इथे डेटा दाखवतोय, असेही राहुल गांधी म्हणाले.
लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे?
महाराष्ट्र निवडणुकीचा आम्ही अभ्यास केला. हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढे मतदार वाढले. २०१९ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये ३४ लाख मतदार वाढले. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येपक्षा जास्त मतदार आहेत. मतदार यादीमध्ये अनेक अनियमितता आढळल्या. लोकसभेला जेवढी मते होती तेवढीच विधानसभेला मिळाली. वाढलेल्या मतदारांची आम्हाला नावे, पत्ता आणि फोटोसह यादी हवी. पाच वर्षांत जेवढे मतदार जोडले गेले त्यापेक्षा जास्त पाच महिन्यांमध्ये जोडले गेले आहेत. महाराष्ट्राची वयस्क लोकसंख्या ९.५४ कोटी आहे, तर निवडणूक आयोगाच्या मते ९.७ कोटी मतदार आहेत. महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे काय, असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्र पॅटर्न आता दिल्ली, बिहारमध्ये राबवणार - राऊत
निवडणूक आयोग सरकारची गुलामी करतेय. आम्ही वारंवार राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आमचे डोके फोडले. ३९ लाख मतदार कुठून आले आणि कुठे जाणार, आता हे ३९ लाख मतदार बिहारला जाणार. नावे तीच राहणार, आधार कार्ड तीच राहणार, फक्त ते मतदार फिरत राहणार. काही दिल्लीत आले, काही बिहारला जातील. महाराष्ट्र पॅटर्न दिल्ली, बिहार मग उत्तर प्रदेशातही राबवणार, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
मतदार यादी द्यावी, सुप्रियांची मागणी
बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, मशीन बंद करावे. आमचा पक्ष फोडला, आमदार, खासदार फोडले, आमची लढाई आजही सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आम्हाला जे चिन्ह दिले, त्यातही साधर्म्य असलेले दिले. लोकसभेला सातारा मतदारसंघात आमचा विजय झाला असता, परंतु तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यात मतांमध्ये तफावत झाली. मतदार याद्यांचा गोंधळ आहे. सशक्त लोकशाही ठेवायची असेल तर पारदर्शक निवडणूक घ्यायला हवी. निवडणूक आयोग पारदर्शी असायला हवा. आम्हाला मतदार यादी, मतदारांचे फोटो, नावे द्यावीत, ही आमची मागणी आहे, असे राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
निराशेचा कळस - बावनकुळे
शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात होणारा पराभव आधीच दिसत असल्यामुळे राहुल गांधी यांची रडारड आतापासूनच सुरू झाली आहे. जनतेने काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्याने नाकारले आहे, हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. आता पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणे, हा निराशेचा कळस आहे,” असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.
...तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही - फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी एकप्रकारे कव्हर फायरिंग करत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की, ८ तारखेला दिल्लीच्या निकालानंतर त्यांच्या पक्षाचे दिल्लीतून अस्तित्व गायब होणार आहे. त्यामुळे निकालाच्या दिवशी काय बोलायचे याचा सराव गांधी करत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी आत्मचिंतन करणार नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
निवडणूक आयोग पूर्ण वस्तुस्थिती मांडणार
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक असल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांना लेखी स्वरूपात पूर्ण वस्तुस्थिती देणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.