बंगळुरू : मतदार यादीतील घोळ समोर आणल्यानंतर निवडणूक आयोगाने माझ्याकडून शपथपत्र मागितले आहे. मला प्रतिज्ञापत्र सादर करावयास सांगितले आहे, मी आधीच संसद भवनात संविधानाची शपथ घेतली आहे. त्यामुळे तुमच्या शपथपत्रावर मी सही करणार नाही, आम्ही हा घोटाळा समोर आणल्यानंतर आता जनता त्यांना प्रश्न विचारते आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संताप व्यक्त करीत निवडणूक आयोगाची मागणी साफ धुडकावून लावली.
राहुल गांधी यांनी गुरुवारी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. भाजपच्या मदतीसाठी निवडणूक आयोग मतांची चोरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानेही त्यांना शपथपत्र पाठवली आहेत. या शपथपत्रावर सही करा, अन्यथा देशाची माफी मागा, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या या भूमिकेनंतर राहुल गांधी चांगलेच संतापले आणि त्यांनी निवडणूक आयोगाची मागणी धुडकावून लावली. बंगळुरूच्या 'फ्रीडम पार्क'मध्ये आयोजित सभेत बोलताना राहुल यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.
संविधानावर आक्रमण
संविधानाची प्रत दाखवत राहुल गांधी म्हणाले, मी संविधानावर हात ठेवून शपथ घेतली आहे. संविधान प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देतो. मात्र, निवडणूक आयोग व त्याचे अधिकारी त्यावर आक्रमण करत आहेत. जे अधिकारी हे करत आहेत, ते वाचणार नाहीत. वेळ लागेल पण त्यांना पकडण्यात येईल. मतदार यादीत जो गोंधळ निर्माण झाला आहे. त्याला जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर अपराधिक कृत्यांतर्गत कारवाई व्हायला हवी. तसेच कर्नाटक सरकारने याचा तपास करावा, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. महाराष्ट्रात फक्त पाच महिन्यांत १ कोटी नवीन मतदार जोडले गेले व या सर्वांनी भाजपला मत दिले, असा दावाही त्यांनी केला.
पाणी मुरते आहे!
निवडणूक आयोगाकडे आम्ही डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे. मात्र, आयोगाने आम्हाला ते देण्यास नकार दिला. याचा अर्थ नक्कीच पाणी मुरते आहे. महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीच्या विश्लेषणातून स्पष्ट झाले की, कर्नाटकात भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांची चोरी केली. प्रत्येक सहामधून एक मत चोरी गेले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सर्वांना शिक्षा मिळेल
कर्नाटकमध्ये आयोजित ‘व्होट अधिकार रॅली’ला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मतांची चोरी करणे संविधानाची पायमल्ली करण्यासारखे आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत देशाचे संविधान वाचवावे लागेल. आपले संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार देते. परंतु, आता देशातील लोकशाही संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधानात महात्मा गांधी, पंडित नेहरू व वल्लभभाई पटेल यांचा आवाज आहे. एक दिवस परिस्थिती बदलेल आणि सर्वांना शिक्षा मिळेल.
संकेतस्थळ बंद
दरम्यान, राहुल गांधी निवडणूक आयोगाने केलेल्या मागणीसंदर्भात म्हणाले की, आयोग माझ्याकडे प्रतिज्ञापत्र मागत आहे. मला त्यांना सांगायचे आहे की, मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे. भारतातील जनता आम्ही सादर केलेल्या डेटावरून (माहिती) निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू लागली आहे. हे बघून आयोगाने त्यांचे संकेतस्थळ बंद केले आहे. निवडणूक आयोगाने राजस्थान व उत्तर प्रदेशमध्ये त्यांचे संकेतस्थळ बंद केले आहे. जनतेने डेटा तपासला तर पोलखोल होईल, अशी भीती त्यांना वाटत आहे, असेही ते म्हणाले.
मते चोरून मोदी पंतप्रधान
राहुल गांधी यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी २५ जागांच्या फरकाने तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. भाजपने ३५ हजार किंवा त्यापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या २५ जागा आहेत. जर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आम्ही सिद्ध करू की मोदी फसवणूक करून पंतप्रधान झाले आहेत. निवडणूक आयोगाने गेल्या १० वर्षांची संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मतदार यादी आणि व्हिडीओग्राफी देशाला द्यावी. जर हे सर्व दिले नाही तर तो गुन्हा आहे. संपूर्ण देशाने निवडणूक आयोगाकडून मतदारांचा डेटा मागितला पाहिजे.