अमित शहा मानहानीप्रकरणी राहुल गांधींनी आरोप फेटाळले; पुढील सुनावणी आता ९ मार्चला

गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील न्यायालयात शुक्रवारी हजर झाले. त्यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आणि स्पष्ट केले की, हा खटला राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आला आहे आणि त्याला कोणताही ठोस आधार नाही.
अमित शहा मानहानीप्रकरणी राहुल गांधींनी आरोप फेटाळले; पुढील सुनावणी आता ९ मार्चला
अमित शहा मानहानीप्रकरणी राहुल गांधींनी आरोप फेटाळले; पुढील सुनावणी आता ९ मार्चला
Published on

सुलतानपूर : गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील न्यायालयात शुक्रवारी हजर झाले. त्यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आणि स्पष्ट केले की, हा खटला राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आला आहे आणि त्याला कोणताही ठोस आधार नाही. राहुल गांधी हे सुमारे २० मिनिटे न्यायालयात उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांचे म्हणणे नोंदवले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ मार्च रोजी होणार आहे.

न्यायालयात असलेल्या उपस्थित वकिलांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधींनी न्यायाधीशांना हात जोडून नमस्कार केला. तसेच सुनावणीनंतरही त्यांनी न्यायाधीशांचे आभार मानले. राहुल सकाळी ९ वाजता दिल्लीहून लखनौ विमानतळावर पोहोचले. तेथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल सकाळी १०.३० वाजता न्यायालयात पोहोचले तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'राहुल जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. त्यांनी त्यांना हार घालण्याचा प्रयत्न केला, पण राहुल यांनी नकार दिला. त्यानंतर ते हसत कोर्टात गेले. नंतर ते रामचेत मोची यांच्या दुकानात गेले. रामचेत यांचे तीन महिन्यांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. रामचेत मोची होते त्यांच्या दुकानात राहुल गांधींनी एक वर्षापूर्वी त्यांचे बूट शिवून घेतले होते. राहुल यांनी रामचेत यांना शिलाई मशीनही पाठवली होती.

प्रकरण ८ वर्षांपूर्वीचे

हे प्रकरण ८ वर्षांपूर्वीचे आहे. राहुल गांधींनी २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान अमित शहा यांच्याबद्दल कथित अपमानजनक टिप्पणी केली होती. राहुल गांधी तेव्हा म्हणाले होते की,' जो पक्ष प्रामाणिकपणाबद्दल बोलतो, त्याचा अध्यक्ष हत्येचा आरोपी आहे'. या वक्तव्यानंतर सुलतानपूरचे भाजप नेते विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. सुलतानपूर न्यायालयाने १९ जानेवारी रोजी राहुल यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने विरोधी पक्षनेत्याचे वकील काशी शुक्ला यांना इशारा देत म्हटले होते की, ही शेवटची संधी आहे, त्यानंतर कठोर कारवाई केली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in