मोदींकडून ‘मॅचफिक्सिंग’चा प्रयत्न! इंडिया आघाडीच्या रॅलीत राहुल गांधी यांचा हल्लाबोल

चार-पाच अब्जाधीशांना हाताशी धरून मोदी ‘मॅचफिक्सिंग’ करीत आहेत. गरीबांना घटनेचे संरक्षण मिळू नये यासाठी हे उद्योग सुरू आहेत. घटना हा जनतेचा आवाज आहे. ज्या दिवशी घटना संपुष्टात येईल त्या दिवशी देश संपुष्टात येईल, असे गांधी म्हणाले.
मोदींकडून ‘मॅचफिक्सिंग’चा प्रयत्न! इंडिया आघाडीच्या रॅलीत राहुल गांधी यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या वतीने दिल्लीच्या रामलीला मैदानात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी ‘मॅचफिक्सिंग’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत, भाजपचे हे प्रयत्न यशस्वी झाले तर देशाची घटना बदलली जाईल आणि जनतेचे हक्क हिरावून घेतले जातील, असे राहुल गांधी म्हणाले.

लोकसभेची यंदाची निवडणूक सर्वसाधारण नाही, तर देशाची घटना आणि लोकशाही यांचे रक्षण करण्यासाठी आहे. क्रिकेटमध्ये पंचांवर आणि कर्णधारावर दबाव आणून तसेच खेळाडूंची खरेदी करून सामना जिंकला जातो आणि त्याला ‘मॅचफिक्सिंग’ म्हटले जाते. आता लोकसभा निवडणुका आहेत, पंचांची निवड कोणी केली आहे, सामना सुरू होण्यापूर्वीच आमच्या दोन खेळाडूंना अटक करण्यात आली आहे, यातून निवडणुकीत मोदी यांचा ‘मॅचफिक्सिंग’चा प्रयत्न सुरू आहे हे दिसून येते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

भाजप ४०० जागा जिंकण्याचा दावा करीत आहे. काँग्रेस मोठा विरोधी पक्ष आहे आणि त्यांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. दोन मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. ही कोणत्या प्रकारची निवडणूक आहे. चार-पाच अब्जाधीशांना हाताशी धरून मोदी ‘मॅचफिक्सिंग’ करीत आहेत. गरीबांना घटनेचे संरक्षण मिळू नये यासाठी हे उद्योग सुरू आहेत. घटना हा जनतेचा आवाज आहे. ज्या दिवशी घटना संपुष्टात येईल त्या दिवशी देश संपुष्टात येईल, असे गांधी म्हणाले.

निवडणुकीत आम्हाला ४०० हून अधिक जागा मिळतील तेव्हा आम्ही घटना बदलू, असे भाजपचा खासदार म्हणतो. धमक्या आणि पोलीस, ईडी, सीबीआयचा धाक दाखवून आपल्याला देशाचा कारभार करता येईल असे त्यांना वाटते. तुम्ही माध्यमे विकत घ्याल आणि त्यांची मुस्कटदाबी कराल, मात्र तुम्ही देशाचा आवाज दाबून टाकू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

इंडिया आघाडीच्या मागण्यांचे प्रियांका यांच्याकडून वाचन

लोकसभेच्या निवडणुका मोकळ्या वातावरणात पार पडतील याची निवडणूक आयोगाने खबरदारी घ्यावी, अशी विनंती इंडिया आघाडीने रविवारी आयोगाला केली. भाजप लोकशाहीविरोधी मार्गाने अडथळे आणत आहे, मात्र आघाडीने निवडणुका लढून, जिंकून देशातील लोकशाहीचे रक्षण करण्याचे ठरविले आहे, असेही आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी इंडिया आघाडीच्या महामेळाव्यात सहा मागण्या वाचून दाखविल्या. निवडणूक आयोगाने निवडणुकीत सर्व पक्षांना समान न्याय द्यावा, असे त्या म्हणाल्या. ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग विरोधी पक्षांवर कारवाई करीत आहेत, त्यामुळे निवडणुकीवर विपरीत परिणाम होत आहे, असे नमूद करून प्रियांका गांधी-वढेरा यांनी अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची त्वरित मुक्तता करावी, अशी मागणी केली. निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांची आर्थिक कोंडी करण्यासारखे प्रकार त्वरित थांबविण्यात यावेत, निवडणूक रोख्यामार्फत भाजप खंडणी वसूल करीत आहे, त्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

रा. स्व. संघ-भाजप विषसमान - मल्लिकार्जुन खर्गे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप हे विष असून त्यांनी देशाचा विनाश केला आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी येथे केली. लोकसभेच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ही निवडणूक लोकशाही, देश आणि घटना वाचविण्यासाठी आहे. आपली एकजूट गरजेची आहे आणि तरच आपण भाजपचा मुकाबला करू शकतो. आपण एकमेकांवर चिखलफेक करीत राहिलो तर आपल्याला यश मिळणार नाही. ही निवडणूक लोकशाही आणि घटनेच्या रक्षणासाठी आहे आणि आपण एकजुटीने ती लढली पाहिजे, असेही ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांच्या ६ गॅरंटी

जुलूमशाही फार काळ टिकत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दीर्घकाळ कारागृहात ठेवता येऊ शकत नाही, असे केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी रविवारी येथे स्पष्ट केले. इंडिया आघाडीच्या महामेळाव्यात सुनीता यांनी अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखविला. या संदेशात विनाखंडित वीजपुरवठा, गरीबांना मोफत वीज, सरकारी शाळा, मोहल्ला दवाखाने-मल्टिस्पेशालिटी रुग्णालये, शेतकऱ्यांना हमीभाव आणि दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा, अशा सहा गॅरंटी केजरीवाल यांनी दिल्या आहेत. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावयास हवा का, असा सवाल सुनीता केजरीवाल यांनी आपल्या पहिल्यावहिल्या राजकीय सभेत जनतेला उद्देशून केला. भाजप मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. त्यांनी राजीनामा द्यावयास हवा का, त्यांच्या अटकेचे समर्थन होऊ शकते का, सरकार त्यांना दीर्घकाळ कारागृहात ठेवू शकणार नाही. जुलूमशाही फार काळ टिकत नाही. जनतेने केजरीवाल यांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत, असे सुनीता केजरीवाल म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in