द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला; राहुल गांधींचा हल्लाबोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी भाजप सरकारवर चढविला. यावेळी राहुल यांनी शेतकरी आंदोलन, पेपरफुटी, अग्निवीर योजना यावरूनही सरकारला लक्ष्य केले.
द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला; राहुल गांधींचा हल्लाबोल
Published on

गुरुदेव द्रोणाचार्यांनी ज्याप्रकारे एकलव्याचा अंगठा मागितला होता, त्याच प्रकारे देशातील सरकार सध्या शेतकरी, युवकांचा अंगठा कापण्याचे काम करीत आहे, असा हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी भाजप सरकारवर चढविला. यावेळी राहुल यांनी शेतकरी आंदोलन, पेपरफुटी, अग्निवीर योजना यावरूनही सरकारला लक्ष्य केले.

लोकसभेत घटनेवरील चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले की, घटना आमचा विचार आहे, घटना हे एक जीवनाचे दर्शन आहे. मात्र, रा. स्व. संघाने नेहमी मनुस्मृतीची तळी उचलून धरली. आज देशात जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांचा अंगठा कापण्याचे काम सरकार करते. देशातील गरीबांचा अंगठा कापण्याचे काम केले जात आहे. आज देशातील तरुण सकाळी ४ वाजता उठून वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करतात. हजारो तरुण दररोज सकाळी उठून ग्राऊंडची तयारी करतात आणि लष्करात जातात, पण केंद्र सरकारने अग्निवीर योजना लागू करून त्या तरुणांचा अंगठा कापण्याचे काम केले आहे. देशात अनेक ठिकाणी पेपर फुटल्याच्या घटना घडल्या. तब्बल ७० वेळा पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या, तेव्हा देखील सरकारने देशातील तरुणांची बोटे कापण्याचे काम केले.

दिल्लीबाहेर तुम्ही शेतकऱ्यांना रोखून त्यांच्यावर लाठीमार केला. ते शेतकरी सरकारकडे काय मागत आहेत, तर शेतमालास किमान हमीभाव म्हणजे त्यांच्या पिकाला योग्य दर मागत आहेत, हे मात्र सरकार अदानी आणि अंबानींचा फायदा करण्याचे काम करते आणि शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचे काम करते. घटनेत असे कुठेही लिहिलेले नाही की पेपर फुटले पाहिजेत, अग्निवीर योजना राबवली जावी असे घटनेत कुठेही नाही, असे म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला.

स्वा. सावरकरांचा अपमान

घटनेमध्ये भारतीयत्व नाही, असे स्वा. सावरकर म्हणाले होते, तोच भाजप घटनेचे रक्षण करण्याची भाषा करून स्वा. सावरकर यांचा उपहास करीत आहे. ज्या स्वा. सावरकर यांच्याकडे भाजप आणि रा. स्व.संघ विचारवंत म्हणून पाहतो त्याच सावरकरांनी वेदांनंतर अधिक पूजनीय मनुस्मृती आहे, असे म्हटले याकडे गांधी यांनी लक्ष वेधले. घटनेचे रक्षण करण्याची भाषा तुम्ही करता ते चांगले आहे, मात्र अशी भाषा तुम्ही करता तेव्हा तुम्ही स्वा. सावरकर यांचा अपमान करता, असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in