

नवी दिल्ली : नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तथाकथित 'अमृत काळ' देशासाठी आता 'विष काळ' बनला आहे, असा हल्ला गांधी यांनी मंगळवारी चढविला.
राहुल गांधी यांनी एक्सवर हिंदीतून पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, परीक्षा रद्द करून या भ्रष्ट भाजप सरकारने २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे कष्ट, त्याग आणि स्वप्ने चिरडून टाकली आहेत. कोणाच्या वडिलांनी कर्ज काढले होते, तर कोणत्या आईने आपले दागिने विकले होते; लाखो मुलांनी रात्रभर जागून अभ्यास केला, मात्र त्याबदल्यात त्यांना काय मिळाले तर पेपरफुटी, सरकारी निष्काळजीपणा आणि शिक्षणातील संघटित भ्रष्टाचार, असे गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, ही केवळ सरकारची अकार्यक्षमता नसून तरुणांच्या भविष्याविरोधात केलेला हा एक मोठा गुन्हा आहे. प्रत्येक वेळी पेपर माफिया मोकाट सुटतात आणि त्याची शिक्षा प्रामाणिक विद्यार्थ्यांना भोगावी लागते. आता पुन्हा एकदा लाखो विद्यार्थ्यांना तोच मानसिक ताण, आर्थिक बोजा आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले. जर एखाद्याचे नशीब मेहनतीवरून नाही तर पैसा आणि ओळखीवरून ठरत असेल, तर शिक्षणाला काय अर्थ उरतो, असा सवालही विरोधी पक्षनेत्यांनी केला.