
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेकदा भाजपवर टीका केली आहे. लंडनमधील एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी केली. यावरून भाजप त्यांच्याविरोधात आक्रमक झाले असून भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "या देशात त्यांचे कोणी ऐकत नाही म्हणून ते परदेशात जाऊन टीका करत आहेत." असे म्हणत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
राहुल गांधींवर टीका करताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, "काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पूर्णपणे माओवादी विचार प्रक्रिया आणि बेईमान घटकांच्या पकडीत गेले आहेत. देशाची जनता राहुल गांधींचे ऐकत नाही, त्यांना समजून घेत नाही. त्यांचे समर्थन करण्याची गोष्ट तर दूरच, विदेशात जाऊन ते विधाने करतात. ते म्हणतात की, भारतात लोकशाही धोक्यात आहे. ही खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे. ब्रिटनमध्ये जाऊन त्यांनी आपल्या भाषणात भारताचा अपमान केला आहे," असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे राहुल गांधींच्या बेजबाबदार टीकेचे समर्थन केले की नाकारले हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. "संघाने देशसेवा, देशभक्ती आणि राष्ट्राप्रती समर्पणाचे मोठे काम केले आहे. पंडित नेहरूही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत होते, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही टीका करत होत्या, राजीवही करायचे आणि आता राहुलही करत आहेत. संघ कुठून कुठे पोहोचला आणि तुम्ही कुठे संपला आहात?" असे म्हणत त्यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.