

नवी दिल्ली : येथील जंतर-मंतरवरील आंदोलनाच्यावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस ‘अत्याचारा’बद्दल उत्तर द्यावेच लागेल, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या मौनावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
प्रयागराज येथे शनिवारी पार पडलेल्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने आपल्याकडे ‘आता कोणताही पर्याय उरलेला नाही’ असे सांगितल्याचे राहुल गांधींनी नमूद केले.
राहुल गांधी यांनी ‘एक्स’ वर हिंदीतून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘काल प्रयागराजमध्ये एका विद्यार्थ्याने मला नेमके हेच सांगितले. वर्षानुवर्षांची तयारी, कुटुंबाची जमीन विकणे, पालकांवर कर्जाचा डोंगर अन् तरीही हाती काहीच नाही. हा त्या विद्यार्थ्याचा पराभव नाही, तर त्याच्या कष्टाचे चीज न करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचे अपयश आहे.
कथित पेपर लीक प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन अनेक दिवस उलटले तरी, दिल्ली पोलिसांच्या कारवाईबाबत अमित शाह यांच्याकडून एक शब्दही बाहेर पडलेला नाही, असे ते म्हणाले. माफी मागण्याऐवजी मोदीजी ‘क्षमादान’ वाटण्यात व्यस्त आहेत, असे ते म्हणाले.
अमित शाहजी, आम्ही उत्तरदायित्वाची मागणी करणे थांबवू असा विचार क्षणभरही करू नका. राजधानीच्या रस्त्यांवर तरुणांवर लाठ्या-काठ्या आणि पेलेट्सचा वापर करण्यात आला. तुम्ही एक शब्दही उच्चारला नाही. आज ना उद्या, तुम्हाला या गुन्ह्याचे उत्तर द्यावेच लागेल,’ असे ते म्हणाले.
विद्यार्थी हे राष्ट्राचे भविष्य आहेत, असे ठामपणे सांगत राहुल गांधी यांनी आपण पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट केले.