
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपावरून शुक्रवारी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्ला चढविला. निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी होताना पाहिले आणि त्याने चोरांना वाचवले. पहाटे ४ वाजता उठायचे, ३६ सेकंदांत दोन मतदारांची नावे हटवायची आणि मग पुन्हा झोपून जायचे, अशा प्रकारे मतचोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
राहुल गांधी मतचोरीच्या मुद्द्यावरून मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर सतत हल्ला करत आहेत. त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मतचोरी आणि मतपत्रिकेतील नावे डिलीट करणे, मते डिलीट करणे असे प्रकार झाल्याचे सांगत पुराव्यासह निवडणूक आयोगाची पोलखोल केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे. शुक्रवारी त्यांनी एक सादरीकरण शेअर करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
याबाबत राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, पहाटे ४ वाजता उठायचे, ३६ सेकंदात दोन मतदारांची नावे डिलीट करायची आणि पुन्हा झोपून जायचे, अशा प्रकारे मतचोरी झाली आहे. यावेळी निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले. निवडणूक आयोग जाणूनबुजून काँग्रेसच्या मतदारांना लक्ष्य करत आहे आणि त्यांची नावे वगळत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
'मतचोरी' स्वाक्षरी मोहिमेत सामील व्हा - प्रियांका गांधी
'मतचोरी स्वाक्षरी' मोहिमेत सामील व्हा, असे आवाहन काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी देशातील जनतेला केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधी यांनी 'मतचोरी' मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले. प्रियांका गांधी म्हणाल्या की, जसे प्रत्येक मत महत्त्वाचे असते, तशीच प्रत्येक स्वाक्षरी महत्त्वाची असते. लोकशाहीसाठी, आपल्या संवैधानिक अधिकारांसाठी प्रत्येकजण महत्त्वाचा असतो. आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या मतदानाच्या अधिकारासाठी आणि आपल्या संवैधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी लढत आहोत. 'एक माणूस, एक मत' या लोकशाही तत्त्वाचे रक्षण करण्यासाठी तुमचा पाठिंबा दर्शवा आणि 'मतचोरी स्वाक्षरी' मोहिमेत सामील व्हा, असेही त्या म्हणाल्या. एका व्हिडीओद्वारे प्रियांका यांनी हे आवाहन केले.