

रायबरेली : जेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तुमच्या घरी येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल बोलतील, तेव्हा त्यांना सांगा की त्यांची संघटना, मोदी आणि शहा हे देशद्रोही आहेत. त्यांनी आपला देश विकण्याचे काम केले असून आपले संविधान, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांवर हल्ला केला आहे, असा जोरदार हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे चढविला.
हे लोक दररोज संविधानावर आघात करत असून त्यांनी देशाचे हित मोजक्या उद्योगपतींच्या घशात घातले आहे, असा गंभीर आरोप गांधी यांनी केला. आपल्या रायबरेली मतदारसंघाच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक क्रांतीकारक वीरा पासी यांच्या स्मरणार्थ आयोजित 'बहुजन स्वाभिमान सभे'त ते बोलत होते. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी जनतेला अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.
भाजपने राहुल गांधी यांच्या या विधानाचा तीव्र निषेध केला असून, ही टीका त्यांच्या 'अराजक मानसिकतेचे आणि चारित्र्याचे' लक्षण असल्याचे म्हटले आहे.
देशावर आर्थिक संकट
मोदींनी नुकतेच जनतेला इंधन वापर, सोन्याची खरेदी आणि परदेशी दौरे कमी करण्याचे जे आवाहन केले होते, त्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी आगामी काळात मोठ्या आर्थिक संकटाचा इशारा दिला. येत्या काही महिन्यांत महागाई प्रचंड वाढणार आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडतील. इराण आणि अमेरिकेमधील युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा येईल आणि त्याचा मोठा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसेल. अशी महागाई तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही पाहिली नसेल, असा दावा त्यांनी केला.
मोदींना निधी
या संकटाचा फटका अंबानी आणि अदानी यांना बसणार नाही, तर फक्त सर्वसामान्य नागरिकांना बसेल, असे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीपूर्वी इंधनाची टंचाई होणार नाही आणि भाव वाढणार नाहीत, असे आश्वासन दिले गेले होते. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. भारतात पेट्रोलचे दर वाढत असताना, अंबानी रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून ते बाहेर देशात निर्यात करत आहेत आणि त्या पैशातून नरेंद्र मोदींना निधी दिला जात आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
तेव्हा मोदी टीव्हीवर रडतील
आगामी दोन-तीन महिन्यांत या संकटाचे परिणाम दिसू लागतील, असे सांगताना राहुल गांधी म्हणाले, "कोरोना काळ आणि नोटाबंदीच्या वेळेसारखेच नरेंद्र मोदी पुन्हा एकदा टीव्हीवर येऊन रडताना दिसतील आणि यात माझी काहीच चूक नाही असे सांगतील. पण मी तुम्हाला सांगतो की, खरी चूक नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आरएसएसचीच आहे, कारण त्यांनी देशाची व्यवस्था आणि संविधान उद्ध्वस्त केले आहे. लोकांना परदेशात न जाण्याचे आवाहन करून स्वतः पंतप्रधान पाच देशांच्या दौऱ्यावर निघून गेल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
संस्थांवर आरएसएसचा ताबा
पंतप्रधानांनी आरक्षणाची व्यवस्था, सार्वजनिक क्षेत्र आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य मोडीत काढल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. आज स्वतंत्र प्रसारमाध्यमांचे अस्तित्व संपवले गेले आहे. सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण केले जात असून, विद्यापीठांमध्ये विज्ञान, इतिहास किंवा भूगोलाचे ज्ञान नसलेल्या, केवळ आरएसएस विचारसरणीच्या लोकांना कुलगुरू पदावर नियुक्त केले जात आहे, असे ते म्हणाले. तसेच, जे लोक भाजपला मतदान करत नाहीत, त्यांची नावे मतदार यादीतून पद्धतशीरपणे वगळली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
'इटलीत चॉकलेट वाटताहेत'
नवी दिल्ली : देशात सध्या आर्थिक संकट घोंघावत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र इटलीमध्ये जाऊन लोकांना चॉकलेट वाटण्यात व्यग्र आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये मोदी त्यांना 'मेलोडी' चॉकलेटचा पुडा भेट देताना दिसत आहेत. यावरूनच राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी हिंदीत केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज देशातील शेतकरी, मजूर, व्यापारी आणि सामान्य जनता डोळ्यात अश्रू आणून जगत आहे, तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान हसत-हसत रिल्स बनवण्यात व्यस्त आहेत आणि भाजपचे लोक त्यावर टाळ्या वाजवत आहेत. ते पुढे म्हणाले, आपल्या डोक्यावर आर्थिक संकटाचे वादळ घोंघावत आहे आणि आपले पंतप्रधान मात्र इटलीमध्ये जाऊन चॉकलेट वाटण्यात मग्न आहेत !