
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या विरोधात चालू असलेल्या बदनामीच्या खटल्यात पुण्यातील न्यायालयाला सांगितले की, विनायक दामोदर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या विचारसरणीचे अनुयायी त्यांना हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका असून त्यांना “प्रतिबंधात्मक संरक्षण” देणे ही राज्याची घटनात्मक जबाबदारी आहे.
सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला आहे. खासदार आणि आमदारांविरुद्धचे खटले पाहणाऱ्या विशेष न्यायालयात हा दावा राहुल गांधी यांनी एका अर्जाद्वारे केला आहे. या खटल्याची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. हा खटला राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविरुद्ध केलेल्या काही आक्षेपार्ह वक्तव्यांशी संबंधित आहे.
गांधींचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी न्यायिक दंडाधिकारी (प्रथम श्रेणी) अमोल शिंदे यांच्यासमोर दाखल केलेल्या अर्जात नमूद केले आहे की, तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी स्वतः मान्य केले आहे की, ते नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे या महात्मा गांधी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या मातृकुळाशी थेट संबंधित आहेत.
न्यायालयात दिले कारण
राहुल गांधी यांच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या लेखी माहितीनुसार, भाजपचे नेते तरविंदर मारवा यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी नीट वागावे, नाहीतर त्यांच्या आजीचे (इंदिरा गांधी) जे झाले, तेच राहुल गांधी यांचे होईल. भाजपच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सात्यकी यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध पाहता राहुल गांधी यांच्या जीवाला हिंदूत्वाचे समर्थन करणाऱ्या जहालमतवाद्यांकडून धोका आहे.
मतचोरीमुळे काँग्रेसला ७० जागांवर फटका
भाजप आणि निवडणूक आयोगाने केलेल्या मतांच्या चोरीमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ७० जागांवर फटका बसला, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तसेच भाजपला ज्या जागांवर विजय मिळाला आहे तो कितपत खरा आहे त्याचा तपासाही पक्षाकडून केला जाईल, असेही ते म्हणाले.