

न्यूयॉर्क : भारत सध्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असून, देशात बेरोजगारीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. उत्पादन क्षेत्राचा पाया कमकुवत झाला आहे. शिक्षण व्यवस्थेतही अनेक मूलभूत समस्या आहेत. सध्याचे आर्थिक धोरण कायम राहिले तर भविष्यात गंभीर संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात मंगळवारी आयोजित चर्चासत्रात राहुल गांधी बोलत होते. भारताचे आर्थिक प्रारूप जवळपास दशकभरापूर्वीच अपेक्षित फलित देण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका करीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारख्या उपक्रमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भारत एका मोठ्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या वस्तुस्थितीकडे माध्यमे किंवा अन्य घटक दुर्लक्ष करू शकतात; मात्र देशासमोर बेरोजगारीची प्रचंड समस्या आहे. शिक्षण व्यवस्थेतही गंभीर त्रुटी आहेत. लघु आणि मध्यम उद्योग तसेच कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, रोजगारनिर्मितीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे देशातील उत्पादन क्षेत्राची नव्याने उभारणी करणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्राच्या माध्यमातून सर्वांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य नाही. सेवा क्षेत्रातून एक, दोन, तीन किंवा पाच टक्के लोकांना रोजगार मिळू शकतो; मात्र संपूर्ण लोकसंख्येला रोजगार आणि भविष्याची हमी देता येणार नाही. असे असतानाही भारताने उत्पादन क्षेत्राकडे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका त्यांनी केली.
खासगी गुंतवणूक का वाढत नाही
देशात खासगी गुंतवणूक का वाढत नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. भारतात केवळ मोजकेच मोठे उद्योगसमूह विस्तारत आहेत. लघु आणि मध्यम उद्योगांना संघर्ष करावा लागत आहे. टाटा समूहाचाही अदानींकडून ताबा घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळात उभारण्यात आलेली आर्थिक व्यवस्था कमकुवत झाली असून, तिची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. उत्पादन क्षेत्र मजबूत केल्याशिवाय देशाचा शाश्वत आर्थिक विकास होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
देशातील विविध भागांत विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांचा संदर्भ देताना राहुल गांधी म्हणाले की, ही आंदोलने अचानक झालेली नाहीत. गेल्या जवळपास दशकभरापासून देशातील राजकीय आणि आर्थिक सत्ता काही मोजक्या घटकांच्या हाती केंद्रित होत असल्याने विविध समाजघटकांकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर विरोध होत आहे. आदिवासी, दलित आणि शेतकरी यांची आंदोलने याच असंतोषाचा भाग आहेत. देशात संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण होत असून, सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे.
ज्ञानेश कुमारांना हटवणे आवश्यक
भारतीय लोकशाही प्रक्रिया पूर्ववत करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविणे आवश्यक असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत असल्यास राजकीय प्रक्रिया प्रभावीपणे सुरू राहू शकत नाही. निवडणूक प्रक्रियेतील विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. निवडणूक गैरप्रकारांबाबत काँग्रेसकडे ठोस पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी भीतीपोटी बोलण्यास तयार नसलेले काही लोक आता पुढे येऊन काँग्रेसला माहिती देत आहेत. ही सकारात्मक बाब असली, तरी दबाव एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास सरकार आक्रमक किंवा हिंसक प्रतिक्रिया देऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
भारताच्या भविष्याबाबत मी आशावादी आहे. मात्र, आपण आपला वेळ वाया घालवत आहोत, याची मला चिंता वाटते. सध्याचीच परिस्थिती आणखी पाच-दहा वर्षे कायम राहिली, तर देश मोठ्या संकटात सापडू शकतो, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
राहुल हे भारतविरोधी प्रचाराचे नेते – भाजप
नवी दिल्ली : राहुल गांधी हे ‘भारतविरोधी प्रचाराचे नेते’ असून परदेशात जाऊन देशाची प्रतिमा मलिन करतात, असा आरोप भाजपने केला. जागतिक संस्थांनी भारताला वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून मान्यता दिली असताना राहुल गांधी मात्र भारताचे वेगळेच चित्र निर्माण करीत आहेत, असे पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटले आहे.