राहुल गांधी यांची ईडीने केली कसून चौकशी,देशभरातुन काँग्रेस कार्यकर्त्यांनची जोरदार निदर्शने

अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते त्यांच्यासोबत ‘ईडी’च्या मुख्यालयाबाहेर जमा झाले होते
राहुल गांधी यांची ईडीने केली कसून चौकशी,देशभरातुन काँग्रेस कार्यकर्त्यांनची जोरदार निदर्शने

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोमवारी ईडीने जवळपास तीन तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान काँग्रेसने देशभर जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध केला. निदर्शने करणाऱ्या अनेक काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.

राहुल गांधी हे सकाळी ११.१० वाजता मध्य दिल्लीतील ‘ईडी’च्या मुख्यालयात हजर झाले. यावेळी अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते त्यांच्यासोबत ‘ईडी’च्या मुख्यालयाबाहेर जमा झाले होते. यावेळी ‘ईडी’ अधिकाऱ्यांनी त्यांची दोन तास कसून चौकशी केली. त्यानंतर दुपारी २.१० वाजता त्यांना भोजनासाठी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर ते ३.३० वाजता पुन्हा ‘ईडी’ कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांची पुन्हा दीर्घकाळ चौकशी करण्यात आली.

काँग्रेस मुख्यालयातून सकाळी राहुल गांधी हे ‘ईडी’ मुख्यालयात आले, तेव्हा त्यांच्याबरोबर प्रियांका गांधी-वड्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम हे समवेत होते. राहुल गांधी यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तिसऱ्या बॅरिकेडजवळ रोखले. यानंतर राहुल आणि प्रियांका गांधी पुढे गेले, तर नेते तिथेच बसून राहिले. या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी व निदर्शने केली. काही वेळाने पोलिसांनी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि बसमधून पोलीस ठाण्यात नेले. नंतर प्रियांका गांधी यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नेत्यांची भेट घेतली.

दरम्यान, राहुल गांधी चौकशीला हजर राहणार असल्याने नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पक्षाचे नेते आणि समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. तसेच देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. फक्त दिल्लीच नाही, तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश आणि केरळसह इतर ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

याप्रकरणी सोनिया गांधी यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी तपास यंत्रणेकडे वेळ मागितला आहे. यानंतर ‘ईडी’ने नव्याने समन्स बजावत २३ जूनला त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. सोनिया गांधींना दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

राहुल गांधींनीही केली ‘ईडी’

अधिकाऱ्यांची चौकशी

राहुल गांधी यांना असिस्टंट डायरेक्टर रँकच्या तपास अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले. वाटेत राहुल यांनी त्यांच्यासोबत चालणाऱ्या सुरक्षारक्षकांना त्यांची नावे विचारली. तसेच तुम्ही येथे किती दिवसांपासून कार्यरत आहात? चौकशीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही असेच तपास अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जाता का? असे प्रश्न विचारले. त्यावर सुरक्षा कर्मचारी व ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी स्मितहास्य करीत उत्तर देणे टाळले. राहुल गांधी तपास अधिकाऱ्यांच्या खोलीत पोहोचले, तेव्हा तिथे अधिकारी उपस्थित नव्हते. त्यांनी विचारणा केल्यानंतर तुम्ही बसा, साहेब येतीलच, असे त्यांना सांगण्यात आले; मात्र राहुल अधिकारी येईपर्यंत उभेच राहिले. अधिकारी पोहोचल्यानंतर त्यांनी राहुल यांना बसण्यास सांगितले. राहुल गांधींना पाणी दिले गेले. त्यांना चहा-कॉफीविषयीही विचारण्यात आले; पण त्यांनी सर्वच गोष्टींसाठी नकार दिला. तसेच त्यांनी एकदाही आपला मास्क काढला नाही. राहुल गांधींनी तपास अधिकाऱ्यांना त्यांचे नाव व पदाची विचारणा केली. राहुल यांनी अधिकाऱ्यांना विचारले, ‘येथे केवळ काँग्रेसच्याच नेत्यांची चौकशी होते की, तुम्ही अन्य लोकांनाही बोलावता?’ मात्र त्यांच्या या प्रश्नाचे अधिकाऱ्याने कोणतेही उत्तर दिले नाही.

राहुल गांधींना विचारण्यात आलेले प्रश्न

तुमची यंग इंडियात किती भागीदारी होती?

तुम्ही यंग इंडियाचे शेअर्स आपल्या नावे का केले?

तुमची यंग इंडियात किती टक्के भागीदारी आहे?

तुमच्यासह आणखी किती जण यंग इंडियाचे शेअरधारक आहेत?

काँग्रेसने १९३८ साली असोसिएट जर्नल्स लिमिटेडची स्थापना केली. त्याअंतर्गत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र काढले जात होते. त्यावेळी ‘एजेएल’वर ९० कोटींहून अधिकचे कर्ज होते. ते कमी करण्यासाठी आणखी एका कंपनीची स्थापना करण्यात आली.

तिचे नाव होते ‘यंग इंडिया’. त्यात राहुल व सोनियांची प्रत्येकी ३८ टक्क्यांची भागीदारी होती. यंग इंडियाला एजेएलचे नऊ कोटी समभाग देण्यात आले. त्या मोबदल्यात यंग इंडिया ‘एजेएल’चे कर्ज फेडणार होती; पण शेअर्सचा वाटा जास्त झाल्यामुळे यंग इंडियाला ‘एजेएल’ची मालकी मिळाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in