
गाझियाबाद : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ बुधवारी संभलला रवाना होत असताना वाटेतच त्यांना गाझीपूर सीमेवर उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले.
दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर जवळपास दोन तास थाबल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वढेरा हे दिल्लीत परतले. दिल्ली-मेरठ द्रुतगती महामार्गावर काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळपासून जमा झाले होते त्यामुळे गाझीपूर सीमेवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
उत्तर प्रदेश विधानसभेतील काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आराधना मिश्रा मोना यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळात सहभागी होण्यापासून रोखण्यात आले आणि नजरकैदेत ठेवण्यात आले, ही सरकारची गुंडगिरी असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र जेव्हा शक्य होईल तेव्हा राहुल गांधी, पक्षाचे कार्यकर्ते आणि आपण संभलला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
एकट्याने जाण्याचीही राहुल यांनी दर्शविली तयारी
दरम्यान, आपण पोलिसांसमवेत एकट्यानेच संभलला जाण्याची तयारी दर्शविली होती, मात्र, त्यालाही परवानगी देण्यात आली नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. आम्ही संभलला जाण्याचा प्रयत्न केला, मात्र, पोलिसांनी त्याला नकार दिला. लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून तेथे जाण्याचा आपल्याला अधिकार आहे, असेही गांधी म्हणाले.
आपण एकट्याने जाण्याचीही तयारी दर्शविली, मात्र तेही पोलिसांनी मान्य केले नाही. काही दिवसांनंतर आले तर तुम्हाला जाण्याची अनुमती देऊ, असे आता पोलीस सांगत आहेत. हे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या अधिकाराच्या विरोधात आहे. आपल्याला तेथे जाण्याची अनुमती द्यावयास हवी होती, असेही ते म्हणाले. पोलिसांचा निर्णय लोकशाहीविरोधी आहे, असे गांधी यांनी हातामध्ये घटनेची पुस्तिका घेऊन सांगितले.