नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन मतदारसंघात विजय मिळवला. नियमानुसार त्यांना संसदेत एकाच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता येऊ शकतं. त्यामुळं त्यांना एक मतदारसंघ सोडावा लागणार होता. त्यामुळं राहुल गांधी नेमका कोणता मतदारसंघ सोडणार, याकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान राहुल गांधी रायबरेलीचं प्रतिनिधित्व करणार असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं. तर वायनाड लोकसभेची जबाबदारी आता प्रियंका गांधी यांच्याकडे देण्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळं आता प्रियंका गांधी वायनाड पोटनिवडणूक लढवणार हे निश्चित झालं आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "आमचे नेते राहुल गांधी दोन ठिकाणांहून निवडून आले आहेत. नियमानुसार त्यांना एक सीट सोडावी लागेल. उद्या शेवटची तारीख असल्यामुळं आज आम्ही पक्षातील लोकांनी बसून ठरवलं की, रायबरेली ही सीट ठेवायला हवी. रायबरेली सीटवरून ते पिढ्यान पिढ्या लढत आलेत. तेथील लोकांना आणि पक्षातील लोकांनाही तसंच वाटतंय. वायनाडच्या लोकांकडूनही त्यांना खूप प्रेम मिळालं. तेथील लोकांनाही वाटतं की, राहुल गांधींनी त्यांचं प्रतिनिधित्व करावं. परंतु कायद्यामुळं हा निर्णय घ्यावा लागत आहे."
दरम्यान राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार असल्यामुळं आता वायनाडची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आली आहे. वायनाडमध्ये काहीच महिन्यांत लोकसभेची पोटनिवडणूक होईल. त्यामध्ये त्या निवडणूकीच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळं प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूकीला सामोऱ्या जाणार आहेत.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या, "वायनाडचे प्रतिनिधित्व करायला मिळाल्यानं मला खूप आनंद झाला आहे. आणि मी त्यांना राहुल गांधींची अनुपस्थिती जाणवू देणार नाही. मी कठोर परिश्रम करेन आणि सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन. रायबरेलीसोबत माझं जुनं नातं आहे. गेल्या २० वर्षापासून मी तिथं काम करत आहेत. रायबरेली आणि अमेठीशी आमचं नातं कधीच तुटणार नाही. भैय्याची मी मदत रायबरेलीत पण करेल. रायबरेलीत आणि वायनाडमध्ये आम्ही दोघं उपलब्ध असू."