शिवजयंतीला राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली; भाजप, राष्ट्रवादीकडून माफीची मागणी

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अनेक सेलिब्रिटी तसेच सर्वसामान्य माणसेही सोशल मीडियावर छत्रपती शिवरायांना अभिवादन करत आहेत. मात्र, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिवजयंतीनिमित्त केलेली पोस्ट वादात अडकली आहे. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले असून त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठवली जात आहे.

राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, “शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.” या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी अभिवादना ऐवजी श्रद्धांजली शब्द वापरल्याने ते चांगलेच कोंडीत सापडले आहेत. राहुल गांधी यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.

राहुल गांधी यांच्याकडून झालेल्या या चुकीमुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलित सापडले आहे. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर आक्रमक झाले असून त्यांनी ही पोस्ट मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. “ज्यांच्या खानदानाचा इतिहास मुघलांच्या आरत्या ओवाळण्याचा आहे. ज्यांच्या पणजोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद लिखाण केले होते, त्या राहुल गांधींना महाराजांबाबत श्रद्धा असण्याचे काही कारण नाही. त्यामुळेचं जयंती दिवशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून शिवरायांचा त्यांनी अपमान केलेला आहे. हा निव्वळ बावळटपणा नाही, नसानसात भिनलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून हे घडलेले आहे. याचा तीव्र निषेध,” असे भातखळकर म्हणाले.

“जाणून-बुजून शिवजन्मोत्सवाच्या दिवशी राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली देण्याचा विकृतपणा दाखवला आहे. महापुरुषांचा फक्त राजकीय फायद्यासाठी वापर करणे, ही काँग्रेसची घाणेरडी मानसिकता नेहमी जनतेसमोर उघड होते. या शिवद्रोही काँग्रेसला तमाम हिंदू बांधव कधीही माफ करणार नाहीत,” अशा शब्दांत महाराष्ट्र भाजपने राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.

या ट्विटवर छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का? जयंती हा साजरा करण्याचा, प्रेरणा घेण्याचा दिवस असतो. त्यामुळे अशा वेळी ‘श्रद्धांजली’ हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. शिवजयंती ही महाराजांच्या विचारांची पुनर्स्मृती करण्याची संधी असते, श्रद्धांजली नव्हे. त्यामुळे सार्वजनिक नेत्यांनी भाषेची आणि परंपरांची योग्य जाण ठेवून विचारपूर्वक शब्दप्रयोग करावा.”

भाजपकडून ‘ध’चा ‘मा’ करून वाद - सपकाळ

महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याप्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, “राहुल गांधींना शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना ‘माय हंबल ट्रिब्युट’ म्हणायचे होते. म्हणजे मी त्यांना अभिवादन करतो, नमन करतो हा त्यांचा त्यामागचा भाव आहे. राहुल गांधींना इंग्रजीमधील हम्बल ट्रिब्युट म्हणायचे होते. त्याचाही अर्थ श्रद्धांजली होतो. पण भाजपने ‘ध’ चा ‘मा’ करत विनाकारण वाद उपस्थित करू नये.”

वचिंत बहुजन आघाडीनेही राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. “राहुल गांधीजी जयंतीनिमित्त श्रद्धांजली नाही तर अभिवादन करतात. तुम्ही लिहिलेल्या शब्दातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. माफी मागा आणि अभिवादन व श्रद्धांजली याच्यातील फरक शिकून घ्या,” असे वंचितने म्हटले आहे.

हा महाराष्ट्राचा अपमान -एकनाथ शिंदे

राहुल गांधी यांचे वक्तव्य हे महाराष्ट्राचा अवमान करणारे आहे. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. त्यांनी तमाम शिवभक्तांची माफी मागायला हवी. देश एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहे. दुसरीकडे राहुल गांधींचे श्रद्धांजलीवाले वक्तव्य अतिशय अपमानास्पद आहे. हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही, तर तमाम शिवभक्तांच्या, लाखो-कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली.

अवमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू - फडणवीस

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फडणवीस यांनी शिवनेरी किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात त्यांना अभिवादन केले. छत्रपती शिवराय हे व्यवस्थापन गुरू व कुशल प्रशासक होते. त्यांनी कल्याणकारी राज्यकारभार कसा चालवावा याचे उदाहरण रयतेसमोर ठेवले. त्यांनी केवळ स्वराज्याचीच स्थापना केली नाही तर देशाभिमान जागृत केला, असेही ते म्हणाले.

शिवरायांनी देशाला प्रेरणा दिली - पंतप्रधान

छत्रपती शिवरायांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व देशाला नेहमीच प्रेरणा देत आले आहे. आपल्या शौर्य आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाद्वारे त्यांनी स्वराज्याचा पाया घातला. त्यांची न्यायमूल्ये व धाडसी नेतृत्वामुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली. सशक्त, स्वावलंबी आणि समृद्ध भारताच्या उभारणीसाठी त्यांनी आम्हाला स्फूर्ती दिली, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे गुणगान केले.

logo
marathi.freepressjournal.in