राहुल, प्रियांकाची पुन्हा धरपकड; 'ज्ञानेशकुमार हटाव'साठी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी खासदारांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी बसने जाण्याचा प्रयत्न केला.
राहुल, प्रियांकाची पुन्हा धरपकड; 'ज्ञानेशकुमार हटाव'साठी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन
राहुल, प्रियांकाची पुन्हा धरपकड; 'ज्ञानेशकुमार हटाव'साठी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलनX|INCIndia
Published on: 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी खासदारांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी बसने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांच्या बस रोखल्याने राहुल, प्रियांका गांधी-वढेरा, खर्गे आणि विरोधकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले त्यानंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियांका यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतल्याने दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा घडला.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह अनेक खासदारांना बुधवारी नवी दिल्लीत पोलिसांनी धरणे आंदोलनादरम्यान बळजबरीने हटवून ताब्यात घेतले. हे सर्व नेते मध्य दिल्लीतील शांग्री-ला हॉटेल जवळील गोलचक्रावर निदर्शने करत होते. पोलिसांनी रोखल्यानंतर हे सर्व नेते आणि खासदार बसमधून जंतरमंतर येथील आंदोलनाच्या ठिकाणाकडे निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांनी गोलचक्रावर ठिय्या आंदोलन सुरू केले. यादरम्यान प्रियंका गांधी आणि इतर महिला नेत्या हातात संविधानाची प्रत घेऊन रस्त्यावरच झोपल्या.

प्रियांकांसह महिलांना बळजबरीने उचलले

घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी यांना खांद्यावर उचलून बळजबरीने बाजूला केले आणि पोलीस व्हॅनमध्ये बसवले. यावेळी काँग्रेसचे अमरिंदर सिंग, राजा वडिंग आणि उदय भानू चिब हे नेते राहुल गांधी यांच्या बसवर चढले, तर मुमताज पटेल बसच्या बॉनेटवर बसल्या. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोठ्या फौजफाट्याने रस्त्यावर झोपलेल्या प्रियंका गांधी आणि इतर महिला नेत्यांना तेथून हटवले. त्यांना बळजबरीने बसमध्ये बसवून आंदोलनावरून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी मध्य दिल्लीतील एका उपाहारगृहात दुपारच्या भोजनाची बैठक घेतली होती, तेथूनच ते बसने जंतरमंतर येथील आंदोलनासाठी निघाले होते. या कारवाईदरम्यान इतरही अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तोपर्यंत आंदोलन सुरूच - राहुल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही, असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. देशातील "सर्वात पवित्र गोष्ट" वाचवण्यासाठी हा लढा सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे आम्हाला रोखू शकत नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रत्येक एफआयआर पदकासारखा...

आकाशवाणी भवनमध्ये अनधिकृत प्रवेश करून धरणे आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वढेरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्येक ‘एफआयआर’ हा माझ्या छातीवरील पदकासारखा आहे, असे म्हणत आपण संविधानाच्या रक्षणासाठी लढत राहणार असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले आहे. इंडिया आघाडीच्या स्नेहभोजनानंतर राहुल गांधी म्हणाले, माझ्यावर आधीच ४५ एफआयआर दाखल आहेत. माझे पुढचे लक्ष्य १०० एफआयआर पूर्ण करण्याचे आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in