

मुंबई : केंद्र सरकारने रेल्वे कायदा, १९८९ मधील महत्त्वाच्या तरतुदींमध्ये सुधारणा केल्या आहेत. या तरतुदींनुसार धूम्रपान, मद्यपान करून उपद्रव करणे, अनधिकृत प्रवेश, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे, अनधिकृत फेरीविक्री तसेच आक्षेपार्ह वस्तू रेल्वेत आणणे अशा गुन्ह्यांवर अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रेल्वे परिसरात धूम्रपान केल्यास आता थेट २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. संबंधित प्रवाशाने दंड न भरल्यास न्यायालयाकडून ५,००० रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.
रेल्वे कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार रेल्वेत मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. अशा व्यक्तींना रेल्वे परिसरातून बाहेर काढण्याबरोबरच २४ तासांपर्यंत साधा कारावास, एक हजार रुपयांपर्यंत दंड, सामुदायिक सेवा किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. वारंवार उपद्रव करणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणाऱ्यांना तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा २,५०० रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. पहिल्या तीन उल्लंघनांसाठी प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तर दंड न भरल्यास न्यायालयाकडून तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.