

नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्रीय मंत्रिमंडळाने ११ लाख ४० हजार ७७० रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा उत्पादकता संलग्न बोनस (पीएलबी) देण्यास बुधवारी मंजुरी दिली. यासाठी २,००९.६१ कोटी रुपये खर्च होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला ७८ दिवसांच्या बोनसपोटी जास्तीत जास्त १७ हजार ९५१ रुपये मिळणार आहेत. दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या सुट्ट्यांपूर्वी हा बोनस दिला जातो.
रेल्वेतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे. यात ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, तसेच गट ‘क’ मधील इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.