रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट होणार स्वस्त; जीएसटी परिषदेत मोठे निर्णय जाहीर

रेल्वेचे फलाट तिकीट, बॅटरी कारची सेवांना जीएसटीतून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात रेल्वेचे फलाट तिकीट व अन्य सेवा स्वस्त होणार आहेत.
रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट होणार स्वस्त; जीएसटी परिषदेत मोठे निर्णय जाहीर
Published on

नवी दिल्ली : रेल्वेचे फलाट तिकीट, बॅटरी कारची सेवांना जीएसटीतून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात रेल्वेचे फलाट तिकीट व अन्य सेवा स्वस्त होणार आहेत. जीएसटी परिषदेची ५३ वी बैठक झाली. यात घेतलेले अनेक निर्णय जाहीर करण्यात आले.

या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, दुधाच्या सर्व डब्यांवरील (स्टील, लोखंड व ॲॅल्युमिनियम) जीएसटीचा दर १२ टक्के करण्याची शिफारस केली आहे. तसेच सर्व कार्टन बॉक्स व डब्यांवर १२ टक्के एकसमान ठेवण्याची शिफारस केली आहे.

फायर वॉटर स्प्रिंकलरसहित सर्व स्प्रिंकलर १२ टक्के जीएसटी लागेल. तसेच शैक्षणिक संस्थानच्या बाहेरील वसतिगृहाबाहेर दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये प्रति व्यक्ती २० हजारांची सूट दिली आहे.

सोलर कूकरवर १२ टक्के जीएसटी लावण्यास मंजुरी दिली आहे. तसेच जीएसटी नियमांच्या कलम ७३ नुसार, डिमांड नोटीससाठी व्याज व दंड माफ करण्याची शिफारस केली. तसेच अपीलिय न्यायाधीकरणासमोर अपील दाखल करण्यासाठी २० लाख रुपये, हायकोर्टासाठी १ कोटी, तर सुप्रीम कोर्टासाठी २ कोटी रुपयांची मर्यादा टाकली आहे.

खतांवरील जीएसटी कमी करण्याचे संकेत

खतांवरील जीएसटी कमी करण्याचा प्रस्ताव मंत्रिगटाला पाठवला आहे. सध्या खतांवर ५ टक्के जीएसटी आहे. अनेक वर्षांपासून खतांवर जीएसटी माफ करावा, अशी मागणी होत आहे. अर्थसंकल्पानंतर पुन्हा जीएसटीची बैठक आयोजित केली जाईल. त्यात काही ठरावीक विषयांवर निर्णय होऊ शकतो.तसेच ऑनलाईन गेमिंगबाबत कोणतीही चर्चा शनिवारच्या बैठकीत झाली नाही.

बनावट जीएसटी इन्व्हॉईसला लगाम

बनावट जीएसटी इन्व्हॉईसवर लगाम घालण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर बायोमॅट्रिक आधार प्रमाणिकरण सुरू केले जाईल. त्यामुळे बनावट चलन वापरून केलेला गैरव्यवहार उघड करण्यास मदत मिळेल. त्यातून इनपूट टॅक्स क्रेडिटचे दावा सोडवण्यास मदत मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in