
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये नियमात बदल केला असून १५ जुलैपासून हा नियम लागू होणार आहे. प्रवाशांना तत्काळ रेल्वे तिकीट बुकिंग करायचे असल्यास त्यांना ‘आयआरसीटीसी’च्या वेबसाईट व ॲपवरून ‘आधार’ ओटीपी गरजेचा आहे. रेल्वेच्या तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता आणणे व बनावट दलालांची मनमानी रोखणे हा यामागचा उद्देश आहे.
तत्काळ तिकीट प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मिनिटातच सर्व तिकिटे बुक होतात. दलाल आणि बनावट एजंट सॉफ्टवेअरचा चुकीचा वापर करून तिकीट बुकिंग करत होते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळणे शक्य होत नव्हते.
आता नवीन नियमानुसार, तिकीट बुकिंगची पहिली संधी प्रवाशांना मिळेल. वातानुकूलित कोचसाठी (एसी) तत्काळ तिकीट बुकिंग सकाळी १० वाजता तर विनावातानुकूलित (नॉन एसी) कोचसाठी ११ वाजता सुरू होते. आता नवीन नियमानुसार, सुरुवातीची पहिली ३० मिनिटे एजंटना तिकीट बुकिंग करण्याची संधी नसेल.
रेल्वेने सांगितले की, एखाद्या प्रवाशाकडे आधार कार्ड आहे. तिकीट बुकिंगच्या वेळी ओटीपी आला नसल्यास किंवा आधार क्रमांक मोबाईलला लिंक नसल्यास त्यांनी आयआरसीटीसी हेल्पलाईनच्या १३९ क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. तसेच प्रवासी रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर मदत मागू शकतात. तसेच आधारशी संबंधित १९४७ क्रमांकावर मदत मागू शकतो.
तिकीट खिडकीवर आधार अनिवार्य
रेल्वेच्या तिकीट खिडकीवरून तत्काळ तिकीट बुकिंग करत असल्यास त्यांनाही ‘आधार’ क्रमांक द्यावा लागेल. या तिकीट खिडकीवर ‘आधार’चे सत्यापन ओटीपीच्या सहाय्याने होईल. जर तुम्ही अन्य प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग करत असल्यास त्या प्रवाशाचा आधार क्रमांक व ओटीपी लागेल.