
नवी दिल्ली : प्रदीर्घ कालावधीनंतर तिकिटांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय भारतीय रेल्वे विभागाने घेतला आहे. रेल्वेच्या नवीन दरानुसार, सामान्य द्वितीय श्रेणीत ५०० किलोमीटरपर्यंत प्रवास करण्यासाठी कोणतीही दरवाढ होणार नाही. मात्र, हाच प्रवास ५०० किमीपेक्षा जास्त असेल तर प्रति किलोमीटर अर्धा पैसे (०.५) अतिरिक्त द्यावे लागतील. १ जुलैपासून ही नवीन दरवाढ लागू होणार असल्यामुळे सामान्य प्रवाशांसह लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
एसी, नॉन एसी आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी ही भाडेवाढ प्रति किलोमीटर १ पैशाने वाढवली जाईल. तसेच एसीसाठी ही भाडेवाढ प्रति किलोमीटर २ पैशाने वाढवली जाईल. जर एखादा प्रवासी मुंबई ते दिल्ली (१४०० किमी) नॉन-एसी ट्रेनने प्रवास करत असेल तर त्याला १४ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. तर एसी क्लाससाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत.
रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. १ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार ऑथेंटिफिकेशन गरजेचे असणार आहे. तत्काळ तिकीट बुकिंग करताना आता अनधिकृत एजंट्स तत्काळ विंडो खुली झाल्यानंतर अर्धा तास तिकीट बुक करू शकणार नाहीत. सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकिटे सहज बुक करता यावीत, म्हणून रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
रेल्वेच्या उपनगरीय तिकिटांमध्ये भाडेवाढ नाही
रेल्वेच्या उपनगरीय तिकिटांमध्ये कोणत्याही स्वरूपाची भाडेवाढ केली जाणार नाही. तसेच द्वितीय श्रेणीच्या प्रवासासाठी देखील भाडेवाढ केली जाणार नाही. मासिक पासाच्या दरातही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.