वेटिंग तिकीट कन्फर्म झाल्याचे २४ तास आधी कळणार; रेल्वे करणार नियमात बदल, सध्या चार्ट बनल्यावर ४ तास आधी मिळते माहिती

बदललेल्या नियमाची अंमलबजावणी ६ जूनपासून प्रथम बिकानेर विभागात लागू करण्यात आली आहे. हळूहळू देशभरातील इतर विभागांमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
वेटिंग तिकीट कन्फर्म झाल्याचे २४ तास आधी कळणार; रेल्वे करणार नियमात बदल, सध्या चार्ट बनल्यावर ४ तास आधी मिळते माहिती
Published on

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रतीक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट) प्रवाशांची तिकिटे ‘कन्फर्म’ झाल्याची माहिती मिळण्याबाबतच्या नियमात बदल करणार आहे. सध्या चार्ट बनल्यावर ४ तास आधी तिकीट ‘कन्फर्म’ झाल्याचे कळते. त्यामुळे ‘वेटिंग’ तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना अनेकदा मनस्ताप होतो. मात्र, लवकरच २४ तास आधी तिकीट ‘कन्फर्म’ झाल्याचे प्रवाशांना कळणार आहे.

रेल्वे याबाबत एका नवीन प्रणालीवर काम करत आहे, ज्यामुळे प्रवासाच्या २४ तास आधीच ‘कन्फर्म’ केलेल्या जागांसह चार्ट जाहीर केला जाईल. त्यामुळे ज्या प्रवाशांना लांबून ट्रेन पकडण्यासाठी यावे लागते त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या बदललेल्या नियमाची अंमलबजावणी ६ जूनपासून प्रथम बिकानेर विभागात लागू करण्यात आली आहे. हळूहळू देशभरातील इतर विभागांमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

नवीन नियमामुळे तत्काळ तिकिट बुकिंग किंवा इतर नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही. तत्काळ तिकिटे प्रवासाच्या एक दिवस आधी बुक केली जातील आणि त्यांची पुष्टीकरण प्रक्रिया पूर्वीसारखीच राहणार आहे.

रेल्वेने १ मेपासून वेटिंग तिकिटांसाठी नवीन नियम लागू केले होते. त्यानुसार ‘वेटिंग लिस्ट’ तिकिटे असलेल्या प्रवाशांना आता स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवास करता येणार नाही. ज्या प्रवाशांची तिकिटे प्रतीक्षा यादीत आहेत त्यांना आता फक्त सामान्य कोचमध्ये प्रवास करता येईल. जर एखादा प्रवासी एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रतीक्षा तिकिटावर प्रवास करताना आढळला तर त्याला दंड आकारला जाईल. वेटिंग तिकिटावर ‘एसी’ कोचमधून प्रवास करणाऱ्यास ४४० रुपये, तर स्लीपर कोचमधून प्रवास केल्यास २५० रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच सदर प्रवाशाला ट्रेनच्या सुरुवातीच्या स्टेशनपासून जिथे पकडले जाईल त्या स्टेशनपर्यंतचे भाडे द्यावे लागेल.

‘ऑटो अपग्रेड’ प्रक्रियेतही बदल

भारतीय रेल्वेने प्रतीक्षा यादीतील तिकिटांसाठी ‘ऑटो अपग्रेड’ प्रक्रियेतही बदल केले. आयआरसीटीसीच्या मते, बर्थ रिक्त असली तरीही स्लीपर क्लास तिकिटे ‘फर्स्ट एसी’मध्ये अपग्रेड केली जाणार नाहीत. आतापर्यंत, जर जागा उपलब्ध नसेल तर प्रतीक्षा यादीतील प्रवाशाचे तिकीट बुक केलेल्या श्रेणीपेक्षा उच्च श्रेणीत सुधारित केले जात असे, परंतु हा नियम आता बदलण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, आता स्लीपर क्लासची तिकिटे फक्त दोन क्लासपर्यंत अपग्रेड केली जातील. स्लीपर क्लास तिकिट जास्तीत जास्त ‘थर्ड एसी’ किंवा ‘सेकंड एसी’मध्ये अपग्रेड केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे, ‘थर्ड एसी’ तिकीट जास्तीत जास्त ‘फर्स्ट एसी’मध्ये अपग्रेड केले जाऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in