उत्तर भारतात पावसाचा कहर सुरुच

सलग तीन दिवस मुसळधार पावसामुळे २८ बळी
उत्तर भारतात पावसाचा कहर सुरुच

नवी दिल्ली : सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी पावसाने उत्तर भारतात कहर केल्यामुळे तब्बल सात राज्यांना फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे आतापर्यंत दगावलेल्यांची संख्या २८ वर पोहोचली आहे. पूर आणि पावसाच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पीएमओच्या म्हणण्यानुसार प्रशासन आणि एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम बचावकार्यात गुंतल्या आहेत. देशातील एकूण पाऊस आता सामान्यपेक्षा जास्त झाला आहे. ९ जुलैपर्यंत सरासरी २३९ मिमी पाऊस झाला होता. आता हा आकडा २४३ मिमी पर्यंत ओलांडला आहे, जो २ टक्के अधिक आहे.

राज्यांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्ते वाहतूकीला फटका बसला आहे. यामुळे खेडेगावांमधील जनजीवन खूपच विस्कळीत झाले आहे. विशेषत: उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात भूस्खलनाचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले आहेत. सततच्या पावसामुळे अनेक राज्यात रस्ते व रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. एकट्या हिमाचल प्रदेशात १७ जणांनी जीव गमावला असून राज्यभरात सुमारे ४हजार कोटींचे नुकसान झाले आहे. तेथील पायाभूत सुविधा उन्मळून पडल्या आहेत. रस्ते, पॉवर स्टेशन्स, ट्रान्सफॉमर्स निकामी झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चार राज्यांमध्ये आपदा निवारक एनडीआरएफच्या एकूण ३९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पंजाबमध्ये १४ तुकड्या कार्यरत आहेत. तर डझनभर तुकड्या हिमाचल प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच उत्तराखंडात ८ तुकड्यात तर हरयाणात ५ तुकड्या तैनात आहेत. प्रत्येक तुकडीत ३० ते ३५ जवानांचा समावेश असून त्यांच्याकडे बोटी, दोरखंड, करवती, आणि अन्य आवश्यक उपकरणे उपलब्ध आहेत.
हरयाणा व पंजाबमध्ये काही ठिकाणी लष्कराने बचाव कार्य केले असून ९१० विद्यार्थी आणि अन्य ५० जणांची सुटका केली आहे. हे सर्वजण पंजाबमधील एका खाजगी विद्यापीठात अडकले होते. अतीवृष्टीमुळे तेथे पाणी भरले होते. दरम्यान उत्तराखंडामध्ये अनेक रस्त्यांवर भूस्खलन झाल्याने ते बंद पडले आहेत. त्यात बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गासह उत्तराखंडातील अन्य प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. हवामान खात्याने राज्यातील ११ जिल्ह्यात अतीवृष्टीचा इशारा दिला आहे. हरिद्वारला गंगेचे पाणी धोक्याच्या पातळीच्या केवळ २ मीटर खाली आहे. अन्य नद्यांवर प्रशासनाने नजर ठेवली आहे.

हिमाचल प्रदेशात गेल्या ५० वर्षातील विक्रमी पाउस पडल्यामुळे तेथील जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. पावसामुळे सुमारे तीन ते चार हजार कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली आहे. या राज्यात गेल्या २४ तासात पावसामुळे एकूण १७ माणसे दगावली आहेत. तसेच चंदरतल, पगल आणि तैलगी नाला या ठिकाणी एकूण ४०० पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. बद्दी, कुल्लु, आणि उना येथे पूल वाहून गेले आहेत तर कुल्लुतील लार्गी वीज प्रकल्प पाण्यात बुडाला आहे.

दुसरीकडे राजस्थान राज्यातील १४ जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले असून जयपूर शहरातील जनजीवन ठप्प झाले आहे. सोमवारी पूर्व आणि मध्य राजस्थानमधील रस्ते, रेल्वे मार्ग आणि सखल निवासी भाग पुराने भरुन वाहात होते. माउंट आबू या ठिकाणी २४ तासात २३१मीमी पावसाची नोंद झाली आहे

logo
marathi.freepressjournal.in