हिमाचल प्रदेशात पाऊसबळी ६० वर

दहा हजार कोटींचे नुकसान
हिमाचल प्रदेशात पाऊसबळी ६० वर

शिमला : हिमाचल प्रदेशात गेल्या रविवारपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलन आणि पुरातील मृतांची संख्या आता ६० वर पोहोचली आहे. तर अनेक जण अजुनही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून राज्यात ढगफुटी आणि अतिवृषटीच्या भीतीची टांगती तलवार आहे. मंडी आणि शिमला जिल्ह्यात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे.

गेल्या रविवारपासून या राज्याला वरुण राजाच्या क्रोधाला सामोरे जावे लागत असून सगळीकडे व्यापक विध्वंस दिसून येत आहे. विशेषत: सुमेर टेकड्या, कृष्णा नगर आणि फागली या ठिकाणांना सर्वाधिक फटका बसला आहे. या ठिकाणी भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. हिमाचल प्रदेशात यंदाच्या पावसाळ्यात एकूण १७० ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे सुमारे ९६०० घरांची पडझड झाली आहे. वरुणराजाच्या क्रोधाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये सोलन, शिमला, मंडी, हमीरपूर आणि कांगरा यांचा समावेश आहे. पोंग धरणातून पाणी सोडल्यामुळे मंडी आणि कांगरा जिल्ह्यात ५०० जण अडकून पडले आहेत. तर मंडी जिल्ह्यात पाच घरांचे नुकसान झाले आहे.

शिमलाच्या सुमेर टेकडी भागात भूस्खलनामुळे १३ जण दगावले आहेत. त्यांचे मृतदेह ढिगाऱ्यांखालून काढण्यात आले आहेत. येथे ढगफुटीमुळे झालेल्या भूस्खलनात शिवमंदीर वाहून गेले आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखु यांनी हवार्इ फतेपूर आणि कांगरातील इंदोरा भागाची पाहणी केली आहे. पावसामुळे झालेले एकूण नुकसान आता दहा हजार कोटींच्या घरात गेले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच राज्यातील पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. राज्यातील अनेक रस्ते बंद पडले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in