
मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई यांचे भाचे राज वाकोडे यांच्या नावाची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात 'कॉलेजियम'ने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय एस. ओक यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सरन्यायाधीशांनी त्यांच्या भाच्याचा नावाला मान्यता देणाऱ्या 'कॉलेजियम' मध्ये म्हणजेच निर्णय प्रक्रियेत राहणे टाळावयास हवे होते.
माजी न्यायाधीश अभय ओक म्हणाले की, मी माझा मुद्दा अगदी स्पष्टपणे मांडतो. प्रथम, जर अशी परिस्थिती उद्भवली की, उच्च न्यायालयाने सरन्यायाधीशांच्या किंवा 'कॉलेजियम'चा सदस्य असलेल्या जवळच्या न्यायाधीशांच्या नातेवाईकाची न्यायाधीशपदासाठी शिफारस केली असेल, तर संबंधित न्यायाधीशाने 'कॉलेजियम'च्या निर्णय प्रक्रियेत भाग घेऊ नये. जर खरोखरच योग्य उमेदवार असेल, तर त्याला न्यायपालिकेने वंचित ठेवावे का, असाही प्रश्न आहे. परंतु या प्रकरणात मुख्य न्यायाधीशांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला नको होते.
विस्तार हवा होता
सरन्यायाधीश या प्रक्रियेत होते की नव्हते हे माहिती नाही, पण त्यांनी आणखी एका वरिष्ठ न्यायाधीशाचा समावेश करून 'कॉलेजियम'चा विस्तार करायला हवा होता. दरम्यान, अभय ओक यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही सरन्यायाधीश असता तर तुमच्या भाच्याला तुम्ही न्यायाधीशपदाची शपथ घेऊ दिली असती का, याला उत्तर देताना अभय ओक म्हणाले की, हा एक काल्पनिक प्रश्न आहे, पण तरीही आपण हे टाळले असते.