

जयपूर : राजस्थानमध्ये पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर निर्णायक विजय मिळवला. काँग्रेसने पंचायत समितीच्या ३,७०१, तर जिल्हा परिषदेच्या ५९९ जागा जिंकल्या. भाजपला पंचायत समितीच्या २,१८१, तर जिल्हा परिषदेच्या ३०१ जागांवर समाधान मानावे लागले. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ३७ जिल्ह्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत ३३ जिल्ह्यांमधील पंचायत समितीच्या जागांच्या संख्येत काँग्रेसने भाजपला मागे टाकले आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला डिसेंबरमध्ये तीन वर्षे पूर्ण होणार असून, त्यापूर्वी आलेला हा निकाल भाजपसाठी धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री शर्मा यांचा गृहजिल्हा भरतपूरमध्येही काँग्रेसने ४६ जागा जिंकल्या, तर भाजपला ३२ जागा मिळाल्या. येथे अपक्षांनी ७६ जागांवर विजय मिळवला. गृह राज्यमंत्री जवाहर सिंह बेढम यांच्या गृहजिल्हा डीगमध्ये काँग्रेसने २५, भाजपने १४, तर अपक्षांनी ४१ जागा जिंकल्या.
राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पंचायत समितीच्या ७,५४३ पैकी ७,३९३ जागांचे, तर जिल्हा परिषदेच्या १,२७५ पैकी ९८१ जागांचे निकाल उपलब्ध झाले होते.
जयपूरमध्ये काँग्रेसने पंचायत समितीच्या २१६ जागा जिंकत भाजपला (८७ जागा) मागे टाकले. जोधपूरमध्ये काँग्रेसला १९५, तर भाजपला ८१ जागा मिळाल्या. भिलवाडामध्ये काँग्रेसने १६५, बिकानेरमध्ये १५५, दौसात १३५ आणि सीकरमध्ये १७९ जागा जिंकल्या. पश्चिम राजस्थानमध्येही काँग्रेसने आघाडी कायम ठेवली.