शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पिपलोदी गावात शुक्रवारी सकाळी प्रार्थना सुरू असतानाच शासकीय प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छत अचानक कोसळले आणि त्यामध्ये सात मुलांचा मृत्यू झाला असून २८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू
Photo : ANI
Published on

झालावाड : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पिपलोदी गावात शुक्रवारी सकाळी प्रार्थना सुरू असतानाच शासकीय प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छत अचानक कोसळले आणि त्यामध्ये सात मुलांचा मृत्यू झाला असून २८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

ढिगाऱ्याखाली अडकलेले सर्व विद्यार्थी इयत्ता सहावी, सातवीचे असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. स्थानिक नागरिकही मदतीसाठी पुढे सरसावले. सर्वांनी एकत्र येऊन ढिगारा हटवला आणि मुलांना बाहेर काढले.

ही दुर्घटना झालावाड जिल्ह्यातील मनोहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे छत बऱ्याच काळापासून जीर्ण झाले होते आणि सततच्या मुसळधार पावसामुळे ते कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात होती. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले, ज्याचा परिणाम म्हणून निष्पाप मुलांना आपला जीव गमवावा लागला. गंभीर जखमी झालेल्या मुलांना झालावाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव पथकासोबत गावकरीही ढिगारा हटवण्याच्या कामात पूर्णपणे गुंतले होते.

मोदींचे मदतीचे आश्वासन

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृत्यू झालेल्या मुलांच्या आत्म्यांना शांती मिळो, अशी प्रार्थना केली. तसेच, त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देशही दिले आहेत. झालावाड शाळा दुर्घटनेत मुलांच्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ट्विटद्वारे मोदी म्हणाले, ही दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना पीडित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. जखमी विद्यार्थी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. यासोबतच सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in