श्रीगंगानगर (राजस्थान): राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली असून, ती थेट मेघालयातील गाजलेल्या हनीमून मर्डर प्रकरणाची आठवण करून देणारी आहे. नवविवाहित पतीचा ‘अपघाती मृत्यू’ म्हणून दाखवलेला प्रकार प्रत्यक्षात पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने घडवून आणलेला खून असल्याचा खुलासा पोलिस तपासात झाला आहे.
नेमकं काय घडलं?
३० जानेवारीच्या संध्याकाळी उशिरा अशिष कुमार आणि अंजू उर्फ अंजली हे नवविवाहित दाम्पत्य फिरायला बाहेर पडले होते. यादरम्यान एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याचा दावा करण्यात आला. या घटनेत अशिषचा जागीच मृत्यू झाला, तर अंजू बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर आढळली. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही गायब असल्याने हा हिट-अँड-रन आणि लूटमारचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी वाटत होते.
पोलिसांचा संशय आणि तपास
श्रीगंगानगरच्या पोलीस अधीक्षक अमृता दुहन यांनी सांगितले की, रात्री सुमारे ९ वाजता या घटनेची माहिती मिळाली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी अशिषला मृत घोषित केले. घटनास्थळी पाहणी करताना आणि शवविच्छेदन अहवालातून काही गंभीर बाबी समोर आल्या. अशिषच्या शरीरावर केवळ अपघाताशी संबंधित नाहीत, तर गळा आवळल्याचे स्पष्ट पुरावे आढळले. विशेष म्हणजे, अंजूला कोणतीही गंभीर दुखापत नव्हती. यामुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला.
हत्येच्या १६ दिवस आधी माहेरी रचला कट
तपासादरम्यान अंजूच्या जबाबांमध्ये सतत बदल होत असल्याचे दिसून आले. तिच्या मोबाईल कॉल रेकॉर्डमधून ती आपल्या माजी प्रियकर संजूच्या सतत संपर्कात असल्याचे उघड झाले. अंजू आणि अशिषचे लग्न अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाले होते, मात्र अंजू या लग्नात असमाधानी होती. पोलिसांच्या चौकशीनुसार, लग्नानंतर प्रियकर संजय उर्फ संजूला भेटता यावे यासाठी अंजलीने पुढील शिक्षण घेण्याचा बहाणाही केला होता. पण आशिषने स्पष्ट नकार दिला. याबद्दल तिने संजूलाही सांगितले. आशिषच्या हत्येच्या १६ दिवस आधी अंजली माहेरी गेली होती. तिथेच तिने आणि तिचा प्रियकर संजयने आशिषची हत्या करण्याचा कट रचला.
पतीला फिरायला नेले आणि काटा काढला
३० जानेवारीच्या रात्री अंजूने अशिषला एका निर्जन रस्त्यावर फिरायला नेले. तेथे आधीच लपून बसलेले संजू आणि त्याचे दोन साथीदार - रॉकी उर्फ रोहित आणि बादल उर्फ सिद्धार्थ - यांनी अशिषवर हल्ला केला. त्याला मारहाण करून गळा आवळून ठार मारण्यात आले आणि नंतर हा प्रकार अपघात असल्याचा बनाव करण्यात आला. घटनेनंतर अंजूने स्वतःचा मोबाईल फोन आणि कानातले दागिने आरोपींना देऊन लूट झाल्याचा देखावा निर्माण केला आणि स्वतः बेशुद्ध असल्याचा अभिनय केला. मात्र, वैद्यकीय आणि तांत्रिक पुराव्यांमुळे हा डाव फसला. पोलिसांनी अंजूसह संजू, रॉकी आणि बादल या चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. संजू हा अंजलीच्या नात्यातलाच असून दोघे ६-७ वर्षांपासून प्रेमात होते, एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते आणि याबद्दल अंजलीच्या घरातल्यांना कल्पना होती, अशी माहितीही समोर आली आहे.
मेघालय हनीमून मर्डरशी साधर्म्य
या घटनेने मेघालयातील गाजलेल्या हनीमून मर्डर प्रकरणाची आठवण करून दिली आहे. त्या प्रकरणात सोनम रघुवंशीने आपल्या प्रियकराच्या मदतीने हनीमूनदरम्यान पती राजा रघुवंशीचा खून घडवून आणला होता. राजस्थानमधील ही घटना देखील त्याच धर्तीवर घडल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.