राजस्थान, तेलंगणमधील अपघातात ५४ जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

मद्याच्या नशेत डंपर चालवणाऱ्या चालकाने एकामागोमाग १७ गाड्यांना व रस्त्यातील पादचाऱ्यांना निदर्यपणे चिरडले. यात १३ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. तर तेलंगणमध्ये खडी घेऊन जाणाऱ्या डंपरने...
राजस्थान, तेलंगणमधील अपघातात ५४ जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी
राजस्थान, तेलंगणमधील अपघातात ५४ जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी
Published on

जयपूर/हैदराबाद : गेल्या २४ तासांत राजस्थानमध्ये २ आणि तेलंगणात १ भीषण अपघात झाला. फलोदी, जयपूर आणि तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण अपघातांनी देश हादरून गेला. मद्याच्या नशेत डंपर चालवणाऱ्या चालकाने एकामागोमाग १७ गाड्यांना व रस्त्यातील पादचाऱ्यांना निदर्यपणे चिरडले. यात १३ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. तर तेलंगणमध्ये खडी घेऊन जाणाऱ्या डंपरने तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसला टक्कर दिली. या भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले.

जयपूरमध्ये मद्यधुंद डंपर चालकाने १७ हून अधिक वाहनांना चिरडले, ज्यात १९ जणांचा मृत्यू झाला आणि ३० जण जखमी झाले. बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. भरधाव वेगातील डंपरने १७ पेक्षा अधिक कार आणि दुचाकींना धडक दिली. जवळपास ५ किलोमीटर अंतर डंपरने भरधाव वेगात कापले. समोर येणाऱ्या वाहनांना डंपर अक्षरश: चिरडत सुटला. डंपरने अनेक वाहनांना चिरडल्याने अनेकांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या काहींनी रुग्णालयात उपचार सुरु असताना जीव सोडला.

अनेकांसाठी काळ ठरलेला डंपर मंडी रोडहून आला होता. तो जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने जात होता. महामार्गावर जाण्याआधी चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर डंपरने अनेक वाहनांना धडक दिली. बऱ्याच दुचाकींना चिरडल्याने रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला. काहींच्या मृतदेहांचे तुकडे रस्त्यावर पसरले. रस्त्यावर कुठे हात, तर कुठे काय, तर कुठे बाकीचे अवयव पसरले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेले काही जणदेखील डंपरच्या कचाट्यात सापडले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. घटनेनंतर रुग्णालयांमध्ये शोककळा पसरली. ट्रॉमा सेंटरच्या बाहेर मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळाला. या अपघातानंतर रस्त्यावर भयंकर दृश्य होते आणि सर्वांनाच यामुळे मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी कॅबिनेट मंत्री सुमित गोदरा आणि सुरेश सिंह रावत यांना अपघातानंतर तातडीने रुग्णालयात पाठवले. त्यांनी जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत आणि काहींना कांवटिया रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

राजस्थानमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर-ट्रक धडकेत १५ जणांचा मृत्यू

राजस्थानच्या फलोदी जिल्ह्यातील माटोडा परिसरातील भारतमाला एक्स्प्रेसवेवर रविवारी संध्याकाळी उशिरा एक भीषण अपघात झाला. जोधपूरमधील सुरसागर येथील रहिवासी असलेले अठरा जण एका टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बिकानेरमधील कोलायत मंदिरातील तीर्थयात्रेवरून परतत होते. हनुमान सागर चौकाजवळ, भरधाव वेगाने येणारा टेम्पो ट्रॅव्हलर अचानक उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. या अपघातात पंधरा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जखमींना तातडीने ओसियन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्यांना ग्रीन कॉरिडॉरद्वारे जोधपूरला पाठविण्यात आले आहे. ही धडक इतकी तीव्र होती की टेम्पो ट्रॅव्हलर पूर्णपणे चिरडला गेला.

टेम्पो ट्रॅव्हलरच्या सीट आणि पत्र्यामध्ये अनेक मृतदेह अडकले होते आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आणि स्थानिकांना खूप संघर्ष करावा लागला. सर्व मृत आणि जखमी जोधपूरच्या सुरसागर भागातील रहिवासी होते. ते कोलायतला भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांसह परतत होते. पोलीस, एसडीआरएफ आणि मदत पथकांनी घटनास्थळी बचाव कार्य केले. भारतमाला एक्स्प्रेस वेवर टेम्पो ट्रॅव्हलरचा वेग जास्त आणि दृश्यमानता कमी असणे ही अपघाताची प्राथमिक कारणे असल्याचे मानले जात आहे, यामुळे चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसत नव्हता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तेलंगाणातील रंगारेड्डी जिल्ह्यात हैदराबाद-विजापूर महामार्गावर एका भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याने झालेल्या अपघतात २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे ७० प्रवासी होते. त्यात महिला, विद्यार्थी आणि कार्यालयात जाणाऱ्या लोकांचा समावेश होता.

हा अपघात चेवेलाजवळच्या मिर्झागुडा गावाजवळ झाला. तंदूर डेपोची बस हैदराबादला जात असताना समोरून खडी घेऊन जात असलेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट बसवर येऊन आदळला. ही धडक एवढी भीषण होती की त्यात बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. तसेच ट्रकमधील खडी बसवर ओतली जाऊन प्रवासी त्याखाली दबले. या अपघातानंतर घटनास्थळी जखमी प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकून स्थानिक लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. तीन जेसीबींच्या मदतीने बसवर कोसळलेला ढीग बाजूला करून जखमींना बाहेर काढण्यात आले.

या अपघातात बस आणि ट्रक अशा दोन्हींच्या चालकांचा मृत्यू झाला. तर मृत्युमुखी पडलेल्या इतर प्रवाशांमध्ये महिला आणि एका १० महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. जखमींना उपचारांसाछी चेवेला सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर गंभीररीत्या जखमी झालेल्यांना अधिक उपचारांसाठी हैदराबादमधील विविध रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मुख्य सचिव रामकृष्णा राव आणि डीजीपी बी. शिवधर रेड्डी यांना त्वरित मदत आणि बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व जखमींना उपचारांसाठी हैदराबादमधील रुग्णालयात हलवण्याची सूचना दगिली आहे. मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून राज्य सरकार आणि राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना सात लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याचप्रमाणे जखमींना सरकार प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देणार आहे.

मृतांच्या नातेवाईकांनादोन लाख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in