नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सोमवारपासून दोन दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान ऋषी सुनक, परराष्ट्रमंत्री डेव्हिड कॅमेरून आणि ब्रिटनचे संरक्षणमंत्री ग्रॅन्ट शॅप्स यांच्या भेटी घेतील.
या भेटीत संरक्षण, सुरक्षा आणि औद्योगिक सहकार्य या विषयांवर चर्चा करतील. राजनाथ सिंह यांच्यासोबत उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ असेल. यात संरक्षण मंत्रालय, डीआरडीओ आणि संरक्षण सामुग्री निर्मिती क्षेत्रातील उच्चाधिकाऱ्यांचा समावेश असेल. भारत आणि ब्रिटन यांच्यात संयुक्तरित्या लढाऊ विमानांची निर्मिती आणि लष्करासंबंधित अन्य उत्पादनांची निर्मिती यावर करार होण्याची शक्यता आहे. तसेच राजनाथ सिंह ब्रिटनच्या संरक्षण निर्मिती क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत आणि ब्रिटनमधील भारतीयांसोबत संवाद साधतील. ब्रिटिश संरक्षण मंत्री शॅप्स यांच्यासोबत चर्चेचा केंद्रबिंदू संरक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्वाच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीवर असेल. या क्षेत्रात द्विपक्षी सहकार्याबाबत दोन्ही नेते चर्चा करतील. तसेच भारत-प्रशांत, पश्चिम आशिया आणि युक्रेन या विषयांवर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होर्इल. २०२२ एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी भारत-ब्रिटन यांच्यात संरक्षण क्षेत्रात भागीदारीवर शिक्कामोर्तब केले होते.
बोरीस जॉन्सन भारत भेटीवर आले असतांना त्यांनी भारतासाठी ओपन जनरल एक्सपोर्ट लायसेन्स देण्याची घोषणा केली होती. तसेच ब्रिटन भारताला संरक्षण साहित्य निर्मितीत सहकार्य करेल असे आश्वासन देखील तत्कालीन पंतप्रधानांनी त्यावेळी दिले होते. भारत आणि ब्रिटन यांच्या द्विपक्षीय संबंधाचा संरक्षण क्षेत्रातील सहकार्य हा मोठा पाया असेल, असे तेव्हाच्या संयुक्त पत्रकात जाहीर करण्यात आले होते. ब्रिटन भारताला लढाऊ विमान निर्मिती व अन्य लष्करी उपकरण निर्मितीत सहकार्य करेल, असे आश्वासन तेव्हा जॉन्सन यांनी दिले होते. राजनाथ सिंह या ब्रिटन भेटीदरम्यान दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्यासाठी पुढील दहा वर्षांचा रोडमॅप तयार करणार आहेत. भारत आणि ब्रिटन व्यापार व अर्थव्यवस्था, संरक्षण, सुरक्षा, हवामान बदल आणि उभय देशांतील जनसंपर्क अशा क्षेत्रात सहकार्य करणार आहेत. विशेषत: लष्करी उत्पादन क्षेत्रात दोन्ही देशांनी सहकार्य करण्याचा निर्धार केला आहे.