राज्यसभेच्या ५ जागांसाठी २४ ऑक्टोबरला मतदान

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ५ जागांच्या पोटनिवडणुकीच्या तारखेची बुधवारी घोषणा केली. पंजाबमधील एक आणि जम्मू-काश्मिरमधील ४ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. पुढील महिन्यात म्हणजे २४ ऑक्टोबरला या जागांसाठी मतदान होणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र ANI
Published on

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ५ जागांच्या पोटनिवडणुकीच्या तारखेची बुधवारी घोषणा केली. पंजाबमधील एक आणि जम्मू-काश्मिरमधील ४ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. पुढील महिन्यात म्हणजे २४ ऑक्टोबरला या जागांसाठी मतदान होणार आहे. खासदार संजीव अरोरा यांच्या राजीनाम्यामुळे पंजाबची राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. तर जम्मू-काश्मीरमधील ४ जागा फेब्रुवारी २०२१ पासून रिक्त होत्या. निवडणूक आयोगाने बुधवारी अधिसूचना जारी करून पोटनिवडणुकीची घोषणा केली. पोटनिवडणुकीची अधिसूचना ६ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केली जाणार आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल केले जातील. १६ ऑक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज मागे घेता येणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल आणि २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. त्यानंतर नवीन राज्यसभा खासदारांची घोषणा केली जाईल.

केजरीवालांचा नकार

संजीव अरोरा यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती की, अरविंद केजरीवाल किंवा मनीष सिसोदिया यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी खासदारकीची निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. पक्षाची राजकीय व्यवहार समिती राज्यसभेवर कोणाची निवड करायची हे ठरवेल. जम्मू आणि काश्मीरमधील चारही जागा फेब्रुवारी २०२१ पासून रिक्त आहेत.

logo
marathi.freepressjournal.in