लोकसभेसह राज्यसभेचे कामकाज तहकूब;जनतेने ८० वेळा नाकारलेले कामकाज बंद पाडत आहेत - मोदी

Parliament Winter Session 2024: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनी जोरदार गदारोळ घातल्यामुळे लोकसभेसह राज्यसभेचे कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
लोकसभेसह राज्यसभेचे कामकाज तहकूब;जनतेने ८० वेळा नाकारलेले कामकाज बंद पाडत आहेत - मोदी
Published on

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनी जोरदार गदारोळ घातल्यामुळे लोकसभेसह राज्यसभेचे कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. आता बुधवारी संसदेच्या कामकाजाला सुरुवात होईल. विरोधकांनी अदानी प्रकरण, वक्फ दुरुस्ती विधेयकासह संभल जिल्ह्यातील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना गदारोळ केला.

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात मशिदीच्या सर्वेक्षणानंतर झालेल्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला आहे. लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संभलमधील हिंसाचारावर चर्चा करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे उद्योगपती गौतम अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी करण्यात आली. पण लोकसभा अध्यक्षांनी सुरुवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाले. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले.

इंडिया आघाडी आणि विरोधकांनी अधिवेशनाच्या आधीच अदानी प्रकरण, वक्फ दुरुस्ती विधेयक आणि इतर मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारकडे मागणी केली होती. पण अधिवेशनाच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी, जनतेने ८० वेळा नाकारलेले लोक आज संसद बंद पाडत असल्याची टीका केली होती. यानंतर वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे कामकाज दिवंगत खासदारांनाही श्रद्धांजली वाहून सुरू करण्यात आले. सभागृहात सभापती जगदीप धनखड यांनी सदनाच्या दिवंगत खासदारांच्या कामगिरीचा उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

यानंतर गौतम अदानींच्या मुद्द्यावरून राज्यसभेत जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली. परंतु धनखड यांनी नियमांचा हवाला देत त्यास परवानगी दिली नाही. गदारोळामुळे राज्यसभेच्या सभापतींनी सभागृहाचे कामकाज आधी ११.४५ वाजेपर्यंत तहकूब केले.

दरम्यान, पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी परत गदारोळ सुरू केल्यानंतर सभापतींनी नराजी व्यक्त करत सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. संविधान दिनानिमित्त मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू राहणार नाही. यामुळे आता सभागृहाचे कामकाज बुधवारी होणार आहे.

लोकसभेतही विरोधकांचा आवाज घुमला

राज्यसभेचे कामकाज बंद पडल्यानंतर अदानी आणि वक्फ दुरुस्ती विधेयकाचे पडसाद लोकसभेतही उमटले. अदानी समूहाबाबत वेळोवेळी सरकारवर निशाणा साधणाऱ्या विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. अदानी प्रकरणावर चर्चा करण्यासह संभल जिल्ह्यातील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सरकारने भूमिका मांडावी, अशी मागणी काँग्रेसने केली. यावरून लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. मात्र कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने लोकसभेचे कामकाजही २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

भाजप हिंदू-मुस्लिम समाजात दरी निर्माण करत आहे - राहुल गांधी

काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संभल हिंसाचारावरून ट्विट करत सरकारवर टीका केली. “संभलमध्ये झालेल्या वादात राज्य सरकारची पक्षपाती आणि अतिघाईची भूमिका दुर्दैवी आहे. सर्वांची बाजू ऐकून न घेता प्रशासनाने असंवेदनशीलपणे कारवाई करून वातावरण बिघडवले. याला थेट भाजप सरकार जबाबदार आहे. भाजप सत्तेचा दुरुपयोग करून हिंदू-मुस्लिम समाजात दरी आणि भेदभाव निर्माण करत आहे. जे राज्याच्या आणि देशाच्याही हिताचे नाही. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि न्याय द्यावा,” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in