आज अयोध्या येथील राम मंदिराच्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर ‘सियावर रामचंद्र की जय’, असे म्हणत मोदींनी राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना संबोधित करायला सुरुवात केली. "राम भारताची प्रतिष्ठा आहे. राम अग्नी नाही, राम ऊर्जा आहे. राम हा वाद नाही, राम हा उपाय आहे. राम फक्त आमचा नाही, राम सर्वांचा आहे. राम केवळ उपस्थित नाही, राम अनादि आहे. रामलल्ला आता तंबूत राहणार नाही, तर दिव्य मंदिरात राहणार आहेत", असे मोदी यावेळी म्हणाले.
मला प्रभू रामाची माफी मागायची आहे-
मला प्रभू रामाची माफी मागायची आहे. आपल्या त्यागात आणि प्रयत्नात अशी काही कमतरता होती की आपण इतक्या दशकांपासून हे काम करु शकलो नाही. आज ती उणीव भरुन निघाली आहे. मला विश्वास आहे की देव मला नक्की माफ करेल, असे मोदींनी यावेळी म्हटले. तसेच, आज आमचा राम शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आला आहे. शतकानुशतके प्रतीक्षा, त्याग, तपश्चर्या, त्यागानंतर रामलल्ला आता तंबूत राहणार नाही, ते आता दिव्य मंदिरात राहणार आहे, असेही ते म्हणाले.
काही लोक म्हणायचे देशभर आग लागेल-
राम मंदिर बांधले तर देशभर आग लागेल असे काही लोक म्हणायचे. असे म्हणणारे लोक परिपक्व भारतीय समाजामध्ये बसत नाहीत. 22 जानेवारी 2024 ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही, ही काळाच्या नवीन चक्राची सुरुवात आहे. आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या तारखेबद्दल आणि क्षणाबद्दल बोलतील, असे त्यांनी सांगितले.
राम भारताची प्रतिष्ठा-
मी रामाचा भक्त आहे. मी हनुमान आणि भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न या सर्वांना नमन करतो. राम सर्वांचा आहे. राम फक्त वर्तमान नसून शाश्वत आहे. राम आग नाही तर उर्जा आहे, राम भारताची प्रतिष्ठा आहे, राम मित्रता आहे, विश्व आहे, असे म्हणत हे केवळ मंदिर नाही तर भारताची ओळख असल्याचेही मोदी म्हणाले.
मोदी पुढे बोलताना म्हणाले की, रामाचे आगमन पाहून अयोध्या आणि संपूर्ण देश आनंदीत झाला आहे. प्रदीर्घ वियोगामुळे झालेला त्रास संपला आहे. राम वनवासात गेले तो कालावधी केवळ 14 वर्षांचा होता, तरीही तो इतका असह्य होता. या युगात अयोध्या आणि देशवासीयांनी शेकडो वर्षे रामाचा वियोग सहन केला आहे. आपल्या अनेक पिढ्यांनी हा वियोग सहन केला आहे.
न्यायव्यवस्थेबद्दल व्यक्त केली कृतज्ञता-
राज्य घटना अस्तित्वात आल्यानंतरही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावरुन अनेक दशके कायदेशीर लढाई सुरुच होती. न्यायाची प्रतिष्ठा जपणाऱ्या भारतीय न्याय व्यवस्थेबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करु इच्छितो. न्यायाला समानार्थी असलेले प्रभू रामाचे मंदिरही न्याय्य पद्धतीने बांधले गेले आहे, असेही मोदी यांनी म्हटले.