समाजाच्या श्रद्धेला 'गंभीर ठेच'; राम मंदिर अपहारप्रकरणी दत्तात्रेय होसबाळे यांची प्रतिक्रिया

अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी मंदिरातील देणगीच्या रकमेत झालेल्या अपहारामुळे सर्व समाज आणि रामभक्तांच्या श्रद्धेला ‘गंभीर ठेच’ पोहोचली असून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
समाजाच्या श्रद्धेला 'गंभीर ठेच'; राम मंदिर अपहारप्रकरणी दत्तात्रेय होसबाळे यांची प्रतिक्रिया
Published on

नवी दिल्ली : अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी मंदिरातील देणगीच्या रकमेत झालेल्या अपहारामुळे सर्व समाज आणि रामभक्तांच्या श्रद्धेला ‘गंभीर ठेच’ पोहोचली असून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

या संपूर्ण घटनेमुळे आम्हा सर्वांना अत्यंत दुःख झाले असून आमच्या मनात तीव्र संताप आहे, असे संघाचे द्वितीय क्रमांकाचे नेते असलेल्या होसबाळे यांनी एक्सवर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. निधी चोरीच्या या कथित प्रकरणानंतर संघाने अधिकृतपणे दिलेली ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. या ‘दुर्दैवी घटनेचा’ गैरफायदा घेऊन ‘हिंदूविरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्ती’ हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा होसबाळे यांनी केला. अशा प्रकारच्या ‘कट-कारस्थानांना’ हाणून पाडण्यासाठी सर्व हिंदूंनी आवश्यक संयम आणि धीर दाखवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची ट्रस्टने गंभीर दखल घ्यावी आणि मंदिर व्यवस्थापनातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी रा. स्व. संघासह संपूर्ण हिंदू समाजाची नैसर्गिक अपेक्षा आहे, असेही त्यांनी नमूद केले. आगामी काळात योग्य आर्थिक व्यवस्थापन, त्रुटीरहित आणि पारदर्शक संचालन प्रणाली आणि पावित्र्य जपून श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट हिंदू समाजाचा विश्वास अधिक दृढ करेल, अशी आम्हाला खात्री आहे, असे होसबाळे यांनी स्पष्ट केले.

……मुख्य आरोपी ताब्यात

अयोध्या पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश शुक्ला याला न्यायालयातून २४ तासांची पोलीस कोठडी मिळवून त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. अविनाश शुक्ला हा मंदिरात येणाऱ्या देणग्यांची मोजणी करण्याच्या कामात गुंतलेला होता. आतापर्यंत या घोटाळ्यात झालेली सर्वाधिक रोख रक्कम शुक्ला याच्याकडूनच जप्त करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

गेल्या पाच वर्षांचे पुन्हा लेखापरीक्षण

अयोध्या : राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या गेल्या पाच वर्षांतील सर्व आर्थिक व्यवहारांचे पुन्हा एकवार लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे फेरलेखापरीक्षण (री-ऑडिट) केवळ मंदिराच्या बांधकामाशी संबंधित खर्चापुरते मर्यादित नसून, यामध्ये भाविकांकडून देणगी म्हणून मिळालेले दागिने, सोने आणि चांदीच्या वस्तूंच्या हिशोबाचीही सखोल तपासणी केली जाणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in