शुभघटिकांची आनंदमयी तिपेडी

परकीय आक्रमणकर्त्यांनी आपल्याला आपली मूळ संस्कृती विसरायला लावली. आता ती आपल्याला पुनर्स्थापित करायची आहे.
शुभघटिकांची आनंदमयी तिपेडी

-विवेक घळसासी (ज्येष्ठ निरुपणकार)

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतकाल, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य आणि अयोध्येत उभे राहत असणारे भव्य राममंदिर ही शुभघटिकांची आनंदमयी तिपेडी आहे, असेच म्हणावे लागेल. प्रभू श्रीरामाच्या चरित्रातून त्यांनी ठायी ठायी जनभावनेला, प्रजातंत्राला दिलेले महत्त्व दिसून येते. भारताला पारतंत्र्यात टाकणाऱ्या शक्तींवर विजय मिळण्याचे महत्त्व स्वातंत्र्यदिन सांगतो, तर रामजन्मभूमीचा प्रश्न राम मंदिराने सोडवला आहे.

२०२४ हे वर्ष राष्ट्रीय जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. १९४७ मध्ये आपण ब्रिटिशांची गुलामी सोडून स्वतंत्र भारत म्हणून मुक्त झालो. सध्या त्याचा अमृतकाल सुरू आहे. दुसरा एक पैलू म्हणजे १९५० मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या संविधानालाही आता ७५ वर्षे पूर्ण होऊ घातल्यामुळे एका अर्थी तोही अमृतकालच आहे. तिसरा पैलू असा की, आता अयोध्येतील रामजन्मभूमीवर श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. म्हणजेच ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होणे, प्रजातंत्र-गणराज्याचे संविधान लागू होणे आणि अयोध्येत रामलल्लांची प्रतिष्ठापना होणे या वेगवेगळ्या गोष्टी वाटत असल्या तरी त्यात एक सुंदर सूत्र आहे.

खरे तर भारत हा वर्षानुवर्षे, अगदी सनातन काळापासून स्वभावत: गणतंत्रवादी देश आहे. अशा या देशावर उपनिवेशवादी ब्रिटिशांनी, फ्रेंचांनी बस्तान बसवून आपल्याला गुलाम केले. आधी त्यांची भूमिका व्यापाराची होती. मग ती राजकीय, येथील साधनसामग्री हातात घेऊन आपल्याला गुलाम बनवण्याची झाली. पण आजही आपण भोगत असलेला, त्यांनी घडवलेला आणि क्रूरतेचा वेगळा आविष्कार लक्षात घ्यायला हवा. तो म्हणजे राजकीयदृष्ट्या भारत स्वतंत्र झाला तरीही वैचारिक आणि सांस्कृतिक पातळीवर तो गुलामच राहावा, असे त्यांचे षड‌्यंत्र होते. त्यामुळेच त्यांनी इथल्या परंपरा, तत्त्वज्ञान, शिक्षणप्रणाली उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्या हेतूने पहिला घाव घालत त्यांनी इथली गुरुकुले उद्ध्वस्त केली. भारतात येण्याआधी ब्रिटिशांनी आपल्या भूभागात केलेल्या सर्वेक्षणात कुठल्याही युरोपीय देशापेक्षा, मुख्यत: ब्रिटिशांपेक्षा इथे गुरुकुलाच्या माध्यमातून उत्तम शिक्षणपद्धती अनुसरली जात असल्याचे समजले होते. आधुनिकता आणि परंपरा या दोन्हीचे ज्ञान भारतातील गुरुकुलांमधून दिले जात होते. यातूनच आक्रमणकाळात टिकणारी एक मानसिकता या देशात अस्तित्वात होती. साहजिकच ती उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने आधी त्यांनी इथली गुरुकुले उद्ध्वस्त केली. खेरीज येथील शिक्षणप्रणालीमध्ये असे मुद्दे मिसळले, ज्यामुळे आपला इतिहास, संस्कृती, धार्मिक तत्त्वज्ञान याविषयी नवशिक्षितांच्या मनात घृणाच उत्पन्न निर्माण व्हावी हा स्पष्ट हेतू होता. असे कारस्थान रचणाऱ्या ब्रिटिशांच्या ताब्यातून आपण राजकीयदृष्ट्या १९४७ मध्ये मुक्त झालो. ही निश्चितच स्वागतार्ह गोष्ट होती. आनंद आणि अभिमानाची बाब होती. पण आपण केवळ मतदानापुरते स्वतंत्र झालो नसून इथे गणतंत्र लागू होणे आवश्यक आहे, हे समजून देणारा दुसरा टप्पाही अत्यंत महत्त्वाचा होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार सत्ताधीश म्हणून एक पक्ष जाऊन दुसरा सत्तेत येणे म्हणजे स्वातंत्र्य नसते तर स्वातंत्र्यात शेवटच्या माणसाच्या शब्दाला महत्त्व असणे गरजेचे असते. संविधान आपल्याला हे स्वातंत्र्य आणि सजगता देते. खऱ्या गरजूंपर्यंत सुविधा पोहोचल्या पाहिजेत, वर्षानुवर्षे गुलामीमध्ये-अशिक्षित राहणाऱ्या, लौकिकार्थाने गावकुसाबाहेरच्या समाजापर्यंत प्रगतीचा प्रवाह पोहोचला पाहिजे, हा घटनाकारांचा त्यामागील विचार होता. कारण, हीच तर भारताची खरी शक्ती होती आणि आहे. शिक्षित लोकांपेक्षा अधिक निष्ठेने, अनेक विपरीत परिस्थितींमध्ये या वर्गानेच भारतातील विविध परंपरा पाळल्या आणि टिकवून ठेवल्या आहेत. पण तरीही प्रगतीच्या संधींमध्ये हा समाजच उपेक्षित राहिला. राष्ट्रघडणीत सर्वाधिक योगदान असूनही त्यांना योग्य आणि न्याय्य स्थान मिळाले नाही. म्हणूनच डॉ. आंबेडकर यांनी समाजातील शेवटचा माणूस सत्तेच्या चिंतनाच्या केंद्रस्थानी आला पाहिजे आणि हळूहळू तो सत्तेतही आला पाहिजे, असे मत मांडले. त्यांच्या या मतांनुसार संविधान आले आणि १९५० मध्ये देशात ते लागू झाले.

आता या दोन बाबींचा अमृतकाल साजरा होत असताना अयोध्येत रामजन्मीभूमीवर भव्य मंदिर उभे राहणे हा अद्भूत योग आहे. राममंदिराचा लढा धार्मिक, मुसलमान-ख्रिश्चनविरोधी वा हिंदूंविपरीत असणाऱ्यांविरुद्धचा तसेच केवळ राजकीय लाभ उठवणारा होता, असे म्हटले जाते तेव्हा अयोग्य वाटते, कारण असे म्हणणारे काही पैलूंकडे दुर्लक्ष करतात. कोणताही देश आपल्या संस्कृतीच्या ताकदीवर उभा राहत असतो. ती ताकद काही चिन्हे वा संकेतांमधून प्रकट होत असते. त्यामुळे आक्रमण करणारे आधी त्या चिन्हे वा संकेतांवर घाव घालतात. इतिहासात याची साक्ष मिळते. कारण असे नसते तर अफजलखानाने तुळजाभवानीचे मंदिर उद्ध्वस्त करण्याचे काही कारणच नव्हते. शिवाजी महाराजांविरोधात लढायचे असते तर त्याने थेट महाराज होते त्या गडावर हल्ला करायला हवा होता. म्हणजेच छत्रपतींना विरोध ही एखाद्याची राजकीय, सत्ता मिळवण्यासाठी अंगिकारलेली भूमिका असू शकते. पण मग त्याने मंदिरे का उद्ध्वस्त केली? वाटेमध्ये येणारी अनेक तीर्थक्षेत्रे का भ्रष्ट केली? त्यांना सोने, नाणे, हिरे, मोतीच लुटायचे असते तर जहाजेच्या जहाजे भरून त्यांनी ते लुटले होतेच. मग त्यांनी सोमनाथ, मथुरा का उद्ध्वस्त केली? या सर्वांचे उत्तर अस्मितेवर, संकेतांवर आणि संस्कृतीवर हल्ला करून आपले खच्चीकरण करण्याच्या उद्देशामध्ये आहे. ब्रिटिशांनी शिक्षण आणि संस्कारातून आपल्याकडे विष पेरले तर मुगल आक्रांत्यांनी इथल्या आध्यात्मिकतेला धक्का दिला. देवालये ही देशातील आध्यात्मिक शक्तीची केंद्रे असून ती उद्ध्वस्त केली तर हा देश पायाखाली चिरडता येईल, हे त्यांना माहीत होते.

या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, संविधान-गणतंत्राचा महत्त्वपूर्ण टप्पा आणि याच वेळी अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. शेवटी राम मंदिराची उभारणी ही केवळ धार्मिक चळवळ नाही. ती धर्माच्या अनुषंगाने असली तरी अमूक एका राजकीय पक्षाला फायदा करून देण्यासाठी उभी राहिलेली नाही. तसा फायदा होणार हे खरे असले, नैसर्गिक न्यायाने भाजप वा अन्य हिंदुत्ववादी संघटनांना तो मिळणार हे निश्चित असले तरी यापलीकडे विचार करता लक्षात येते की, ‘भारता’ला स्वतंत्र अस्तित्व नसल्याच्या काळापासून रामजन्मभूमीचा लढा सुरू होता. हा जगातील अशा स्वरूपाचा एकमेव लढा म्हणता येईल. याला एका इस्रायलचा अपवाद आहे. कारण तिथे विखुरलेल्या ज्यू लोकांनी आधी आपल्या मनात हे राष्ट्र निर्माण केले आणि त्यातून इस्रायलचा उदय झाला. पण त्यांचा संघर्षही खूप कमी काळाचा होता. उलटपक्षी, राम मंदिरासाठी सुरू असणाऱ्या संघर्षाला तब्बल पाचशे वर्षांची पार्श्वभूमी आहे. इतका दीर्घकाळ एखादा समाज संघर्ष करतो तेव्हा त्यापाठी २०२४ मध्ये नरेंद्र मोदींना राजकीय लाभ व्हावा हा हेतू नक्कीच नसतो. या लाटेवर आरूढ झाले, ही एक वेळ नरेंद्र मोदी यांची चतुराई म्हणता येईल. पण आरूढ होण्यास सगळ्यांनाच मोकळीक होती. थोडक्यात, दोन-पाच एकर जागेसाठी एखादा देश ५०० वर्षे लढा देतो तेव्हा त्यामागील कारणे तेवढीच बलिष्ट असतात, हे समजून घ्यावे लागेल. या लढ्यात अनेक कारसेवकांचे प्राण गेले, काहींची आयुष्ये उद्ध्वस्त झाली. तीव्र संघर्ष करून त्यांना नेमका कोणता राजकीय लाभ मिळणार होता? हे सगळे लक्षात घेता या विषयाकडे वरवरच्या नजरेतून बघणे योग्य नाही.

परकीय आक्रमणकर्त्यांनी आपल्याला आपली मूळ संस्कृती विसरायला लावली. आता ती आपल्याला पुनर्स्थापित करायची आहे. खरे तर हाच कोणत्याही जिवंत राष्ट्राचा स्वभाव असतो. अयोध्येतील राम मंदिरात होणारी रामलल्लाची प्रतिष्ठापना केवळ एका समारंभापुरती सीमित नाही तर हे आत्मविस्मृततेकडून आत्मभानाकडे जाणारे संक्रमण आहे. हे उपनिवेशवादाकडून स्वदेशवादाकडे नेणारे संक्रमण आहे. सांस्कृतिक दास्यातून सांस्कृतिक स्वाधिनतेकडे जाणारे संक्रमण आहे. श्रीराम हे असे तत्त्व आहे, ज्यात स्वातंत्र्य आणि गणतंत्र या दोन्हीचाही प्रत्यय येतो. त्याची प्रतिष्ठापना देशाला नव्याने या मूल्यांची ओळख करून देईल. मुळात भारतीय मातीच्या कणाकणातच गणतंत्र आहे. याचे एक उदाहरण सांगतो. गांधर्वविवाह केल्यानंतर राजा दुष्यंत आणि शकुंतलेला मुलगा झाला. त्या मुलाला घेऊन शकुंतला राजा दुष्यंताच्या दरबारात गेली तेव्हा त्याने प्रथम तिला ओळखच दिली नाही. त्यावेळी दरबारात उपस्थित असणाऱ्या जनप्रतिनिधींनी शकुंतलेची बाजू ऐकून तिचा युक्तिवाद खरा असल्याचे सांगत पत्नी म्हणून तिचा स्वीकार करण्याचे राजाला सूचित केले. त्यानंतर एकांतात दुष्यंत आणि शकुंतलेची भेट झाली असता राजाने आल्या आल्याच तुला ओळखले होते, अशी कबुली तिला दिली आणि शकुंतलेला तो म्हणाला, ‘समजा, मी लगेचच तुझा स्वीकार केला असता पण जनतेने आपल्या विवाहाला मान्यता दिली नसती तर मी आपल्या मुलाला म्हणजेच भरताला उत्तराधिकारी करू शकलो नसतो...’

पुराणांमधील हे एक उदाहरणही या मातीत खोलवर रुजलेल्या गणतंत्र आणि लोकभावनेच्या आदराची साक्ष देऊन जाते. राम मंदिराच्या उभारणीमुळे लोकभावनेचा सन्मान होतो आहे. त्यामुळे या सर्व अर्थांनी मंगल, पावन पर्वांचे स्वागत करू या आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना करू या

logo
marathi.freepressjournal.in