राम मंदिर: केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव

अयोध्येत श्रीराममंदिरातील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास अभिनंदन करणारा ठराव बुधवारी संमत केला.
राम मंदिर: केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव

मुंबई : अयोध्येत श्रीराममंदिरातील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास अभिनंदन करणारा ठराव बुधवारी संमत केला. मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन या ठरावाद्वारे केले आहे. या ठरावामध्ये विविध मुद्देही मांडण्यात आले आहेत.

भारतीय संस्कृती गेली पाच शतके जे स्वप्न पाहत होती, ते शतकांपूर्वीचे स्वप्न आपण पूर्ण केले. ऐतिहासिक घटना अनेकवेळा घडल्या असतील, पण ही मंत्रिमंडळ व्यवस्था निर्माण झाल्यापासून आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचा काळ ब्रिटिश काळाशी जोडला, तर अशी संधी कधीच प्राप्त झाली नसेल. कारण, २२ जानेवारी २०२४ रोजी आपल्या माध्यमातून जे काम झाले, ते इतिहासात अद्वितीय आहे, असेही यात म्हटले आहे.

ही घटना हे अद्वितीय आहे कारण ही संधी अनेक शतकांनंतर आली आहे. १९४७ मध्ये या देशाचे शरीर स्वतंत्र झाले आणि आता त्यामध्ये आत्म्याची प्रतिष्ठापना झाली आहे, असे आपण म्हणू शकतो. यामुळे प्रत्येकाला आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळाली आहे, असाही एक मुद्दा या ठरावात मांडला गेला आहे. पंतप्रधानांचे अभिनंदन करताना ठरावात म्हटले आहे की, भारताचा सनातनी प्रवाह आणि जागतिक प्रभावाचा आधारस्तंभ असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी नियतीने तुमची निवड केली आहे. तसेच आपण आपल्या कामाने या देशाचे मनोबल उंचावले आहे आणि सांस्कृतिक आत्मविश्वासाला बळ दिले आहे.

•या ठरावात आणीबाणीचाही उल्लेख करत म्हटले आहे की, आणीबाणीच्या काळातही आपण जन आंदोलनाच्या रूपात लोकांमध्ये एकजूट पाहिली होती, पण ती हुकूमशाहीविरोधात प्रतिकार करण्यासाठी चळवळ म्हणून उभी राहिली होती.

त्याचप्रमाणे एवढा मोठा विधी तेव्हाच पार पडू शकतो जेव्हा विधी पार पाडणाऱ्या व्यक्तीवर देवाची कृपा असते.तुम्ही ११ दिवसांचे व्रत पाळले आणि भारतातील प्रभू श्रीरामाशी संबंधित तीर्थक्षेत्रांना भेट देऊन तपश्चर्याच्या भावनेने उपासना करून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला ऊर्जा प्रदान केली. यासाठी आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाचे केवळ सदस्य म्हणून नव्हे तर एक सामान्य नागरिक म्हणून आपले अभिनंदन करतो, असेही या ठरावात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in