
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात रविवारी रामनवमीचा उत्सव जल्लोषात व प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. रामलल्लाच्या मूर्तीवर दुपारी १२ वाजता ४ मिनिटे ‘सूर्यतिलक’चा सोहळा यावेळी पार पडला. तसेच रामलल्लाच्या मूर्तीवर ‘महामस्तकाभिषेक’ करण्यात आला. भाविकांसाठी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. देशभरातून रामनवमी दिवशी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत उत्साहाचे वातावरण आहे. ढोल-ताशाच्या गजराने अयोध्या नगरी दुमदुमली आहे. राम मंदिरात प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली.
अयोध्येतील राम मंदिरात महाआरतीनंतर सकाळी जन्मोत्सव कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रभू श्रीरामांना महामस्तकाभिषेक करण्यात आला. त्यानंतर जवळपास एक तास रामलल्लाचा शृंगार पार पडला. बरोबर १२ वाजता सोन्याच्या धाग्यासोबत पितांबर वस्त्र तसेच आभूषण घालण्यात आले. तसेच प्रभू श्रीरामांना ५६ प्रकारचे भोग प्रसाद दाखवण्यात आला.