आरंभी वंदीन अयोध्येचा राजा! राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा आज

सर्वोच्च न्यायालयाने मंदिर बांधण्यासाठी अनुकूल निकाल दिल्यानंतर २०२० मध्ये श्रीराम मंदिराचे बांधकाम जोमाने सुरू झाले.
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा! राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा आज

अयोध्या : विश्व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या ३३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर सोमवारी अयोध्येतील राम जन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश श्रीराममय झाला आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सोमवारी दुपारी १२.२० वाजता सुरू होईल आणि

दुपारी १ वाजता संपेल. दुपारी १२.२९ ते १२.३० या वेळेत प्राणप्रतिष्ठा केली जाईल, त्यानंतर रामलल्लाची मूर्ती खऱ्या अर्थाने विराजमान होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी फुलांच्या माळा, दिव्यांची आरास, रांगोळ्यांनी अयोध्यानगरी सजली आहे. प्रभू श्रीरामाच्या आगमनाचा हा हर्ष साऱ्या नगरीत दिसून येत आहे. अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह हजारो निमंत्रित तसेच व्हीआयपी पाहुणे सहभागी होणार आहेत.

प्रभू श्रीरामाच्या पावन अयोध्यानगरीमध्ये तुमचे स्वागत आहे... असे रामभक्तांचे स्वागत करणारे फलक जागोजागी दिसत आहेत. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आठ हजार निमंत्रित सोमवारी दाखल होणार असून दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. अयोध्येत रामपथाच्या मध्यभागी लावण्यात आलेले भगवे झेंडे आणि प्रभू रामाचे मोठे कटआऊट यांनी शहर सजले असून, आजूबाजूच्या मंदिरांमध्ये लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरवर ‘जय सीयाराम’च्या घोषणा ऐकू येत आहेत. ‘शुभ घडी आयी’, ‘तैयार है अयोध्याधाम, विराजेंगे श्रीराम,’ ‘राम फिर लौंटेंगे’ अशा घोषणा शहरभर लागलेल्या पोस्टरवर दिसून येत आहेत. राम मार्गावर, शरयू नदीच्या काठावर; तसेच लता मंगेशकर चौकात मोठ्या प्रमाणात पोस्टर लागले असून, रामायण या महाकाव्यातील ओळी त्याच्यावर झळकत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मंदिर बांधण्यासाठी अनुकूल निकाल दिल्यानंतर २०२० मध्ये श्रीराम मंदिराचे बांधकाम जोमाने सुरू झाले. आता जवळजवळ बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या अनावरणासाठी संपूर्ण जगातील हिंदू उत्सुक असून देशात दिवाळी साजरी करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. मुंबई ते कोलकाता आणि काश्मीर ते कन्याकुमारी, असा उभा-आडवा संपूर्ण भारत भगव्या झेंड्यांनी सजत आहे. अयोध्यानगरी तर दशलक्ष दीपांनी झळाळून निघणार आहे. सोहळ्याची तयारी पाहता, अयोध्येत जणू त्रेतायुग अवतरले आहे. गदिमांच्याच शब्दातच सांगायचे तर ‘शरयू-तीरावरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी, त्या नगरीच्या विशालतेवर, उभ्या राहिल्या वास्तू सुंदर, मधुन वाहती मार्ग समांतर, रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी, घराघरावर रत्नतोरणें अवतीभोवती रम्य उपवनें, त्यांत रंगती नृत्य गायनें, मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी’ अशा प्रकारे अयोध्या नगरी सजली असून जगभरातून ८ हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

१६ जानेवारीपासून राम मंदिरात रामलल्लाच्या विधींना सुरुवात झाली. रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक विधी रविवारपर्यंत पार पाडण्यात आले. गेले सहा दिवस प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या गर्भगृहामध्ये ८१ पवित्र ठिकाणांहून कलशातून आणण्यात आलेले जल शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले.

दरम्यान, रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ७ हजार १४० निमंत्रक हजेरी लावणार आहेत. शिवाय ११२ परदेशी पाहुणेही या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत. रामनगरी अयोध्येत १५० चार्टर्ड विमाने उतरणार आहेत. मोठ्या व्हीव्हीआयपी घडामोडींमुळे अयोध्यानगरीला छावणीचे रूप आले आहे. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी एसपीजीची आणखी एक टीम अयोध्येत पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील तीन वाहने, जॅमरने सुसज्ज फॉर्च्युनर आणि दोन बुलेटप्रूफ लँड क्रूझर अयोध्येत दाखल झाली आहेत.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रामभक्तांनी २२ जानेवारी रोजी अयोध्येत येऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच केले आहे. संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा ऑनलाईन दाखवण्यात येणार आहे. या सोहळ्याचे प्रक्षेपण ठिकठिकाणी मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशातल्या विविध प्रांतांतील १४ दाम्पत्ये ‘यजमान’ असणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने शनिवारी १४ नावांची यादी जाहीर केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील विठ्ठलराव कांबळे (खारघर) व घुमंतू समाज ट्रस्टचे महादेवराव गायकवाड (लातूर) हे सपत्नीक सहभागी होणार आहेत. एका जोडप्याचे नाव नंतर जाहीर करण्यात येणार आहे. यजमान म्हणून ही जोडपी राम मंदिर अभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विधी पार पाडणार आहेत.

१० लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या

राम मंदिरात सोमवारी रामलल्लाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अभिषेक सोहळ्यानंतर संध्याकाळी अयोध्या नगरी दिव्यांनी सजवली जाईल. प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघणार आहे. त्यासाठी अयोध्येत १० लाख दिवे लावण्याची तयारी सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी शरयू नदीच्या काठावर मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार आहे.

मंदिर वही बनायेंगे

६ डिसेंबर १९९२ रोजी जलालाबाद येथे एका घरात काव्य संमेलन सुरू होते. अचानक बातमी धडकली की, अयोध्येतील वादग्रस्त इमारत कारसेवकांनी उद्ध्वस्त केली. संमेलनाचे पाहुणे जिल्हाधिकारी होते. ते बातमी ऐकून त्वरित तडकाफडकी रवाना झाले. कविसंमेलन मंचावरून एक आवाज निघाला, ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनायेंगे.’ कवी विष्णु गुप्त यांच्या मुखातून आपसुकपणे हे वाक्य निघाले. पुढे श्रीराम मंदिर चळवळीचे हे ध्येय वाक्य बनले.

हे जाणार नाहीत!

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी देशभरातील व्हीव्हीआयपी मंडळी अयोध्येत दाखल होणार आहेत. भाजपसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा असला तरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मात्र उपस्थित राहणार नाहीत. त्याचबरोबर सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीत, असे सांगण्यात आले. २२ जानेवारीला अयोध्येला न जाता, नंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत. दर्शनाला जाण्याचा दिवस, वेळ अद्याप लवकरच ठरवण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. ‘द काश्मीर फाइल्स’चे चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना निमंत्रण पाठवलेले असूनही ते या सोहळ्याला जाणार नाहीत.

दिल्ली एम्सचा अर्धा दिवस ओपीडी बंदचा निर्णय मागे

दिल्लीस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आता सोमवारीही चालू राहणार आहे. अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २२ जानेवारी रोजी रुग्णालयाचा ओपीडी अर्धा दिवस बंदचा निर्णय अखेर एम्स प्रशासनाने मागे घेतला आहे. एम्सने रविवारी परिपत्रक जारी करून रुग्णालयाची ओपीडी सेवा सामान्यपणे चालू राहणार आहे, असे सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in