

अयोध्या : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने सुरक्षेतील गंभीर त्रुटी, कमकुवत देखरेख आणि मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. यामुळेच रोख देणग्यांची चोरी करणे शक्य झाले, असे एसआयटीने सोमवारी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’समोर सादर केलेल्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. दरम्यान, प्राथमिक अहवालात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय किंवा विश्वस्त गोपाळ राव यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे राय यांना ‘क्लीनचिट’ देण्यात आली आहे की त्यांच्या भूमिकेचा तपास अजून सुरू आहे, असे प्रश्न राजकीय व सामाजिक वर्तुळात निर्माण झाले आहेत.
अहवालात रामशंकर यादव उर्फ टिन्डू याला या कथित घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मानले गेले आहे. ट्रस्टकडून कोणतेही औपचारिक किंवा लेखी अधिकार नसतानाही त्याच्याकडे मंदिर परिसरातील अनेक देणगी पेट्यांच्या (हुंडी) चाव्या होत्या. एसआयटीच्या माहितीनुसार, टिन्डूने आपला भाचा मनीष यादव याला रोख रक्कम मोजण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेतले आणि त्याला मोजणीच्या ड्युटीवर तैनात केले, ज्यामुळे देणगीतील पैसे लंपास करण्याची संधी मिळाली.
उपलब्ध फुटेज २७ एप्रिल २०२६ पासूनचे आहे आणि त्यापूर्वीच्या कोणत्याही घटनेची नोंद उपलब्ध नाही. मर्यादित सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरीच्या घटनांची एकूण संख्या आणि चोरी झालेली अचूक रक्कम निश्चित करणे आता अशक्य झाले आहे, असे अहवालात नमूद आहे. एसआयटीने मोजणी कक्षाचे प्रभारी सुभाष श्रीवास्तव यांच्यावरही जबाबदारी निश्चित केली असून, त्यांच्याच उपस्थितीत पैसे लंपास करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्राथमिक अहवाल
एसआयटीने स्पष्ट केले आहे की हा केवळ प्राथमिक अहवाल असून तपास अद्याप सुरू आहे. अंतिम अहवालात पर्यवेक्षकीय अपयश, प्रशासकीय उत्तरदायित्व, संस्थात्मक त्रुटी आणि सुधारणात्मक उपायांसाठीच्या शिफारशींचा सविस्तर तपशील असेल. देशातील अत्यंत प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या राम मंदिरातील देणग्यांच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणि कडक आर्थिक नियंत्रणाची मागणी या निष्कर्षांमुळे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
७० वेळा चोरी
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, उपलब्ध असलेल्या ४५ दिवसांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी जवळपास ७० वेळा चलनांच्या नोटांचे बंडल चोरताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, केवळ ४५ दिवसांचेच फुटेज जतन करून ठेवल्यामुळे चोरीची नेमकी व्याप्ती आणि एकूण किती रकमेची अफरातफर झाली, हे कधीही स्पष्ट होऊ शकणार नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.