रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रक्षेपणावर तामिळनाडूत बंदी; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

लाईव्ह प्रक्षेपण बंद करण्यामागे कायदा व सुव्यवस्थेचे कारण तामिळनाडू सरकार देत आहे.
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या 
प्रक्षेपणावर तामिळनाडूत बंदी; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

नवी दिल्ली : रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यास तामिळनाडू सरकारने बंदी घातली आहे, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला.

त्या म्हणाल्या की, तामिळनाडूमध्ये श्रीरामाची जवळपास २०० मंदिरे आहेत. या मंदिरात कोणताही धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी आणण्यात आली आहे. मंदिरामध्ये रामाच्या नावाने पूजा, भजन, प्रसाद वाटप करण्यास मनाई करण्यात आली आहे. इतर काही मंदिर राम उत्सव साजरा करू पाहत आहेत, पण त्याला पोलीस आडकाठी आणत आहेत. मंडप तोडण्याची त्यांना धमकी दिली जात आहे. अशा प्रकारच्या हिंदूविरोधी आणि द्वेषपूर्ण कृतीचा मी निषेध करते, असे त्या म्हणाल्या.

लाईव्ह प्रक्षेपण बंद करण्यामागे कायदा व सुव्यवस्थेचे कारण तामिळनाडू सरकार देत आहे. पण, हे खोटे आणि चुकीचे गृहितक आहे. अयोध्येचा निकाल आला तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी केली तेव्हा देशाच्या कोणत्याही भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. जनता स्वयंत्स्फूर्तपणे श्रीरामच्या उत्सवात भाग घेऊ पाहात आहे, पण तामिळनाडू सरकार हिंदूविरोधी असल्याने त्यांना याचा त्रास होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in