विशेष: रामोत्सव!

देशविदेशातील भक्तांनी दूरचित्रवाणीवरील थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून हा हृद्य सोहळा मनाच्या पटलावर चिरंतन कोरून ठेवला.
विशेष: रामोत्सव!

अयोध्या: सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटांच्या ठोक्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या भव्य मंदिरातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या बालरूपातील मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टी दूर केली आणि जगभरातील रामभक्तांच्या मनावरील शंकेचा पडदाही दूर हटला. शतकानुशतकांची प्रतीक्षा आता संपली होती. समस्त देशवासीयांचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्रोत असलेल्या श्रीरामाचा वनवास संपून तो हक्काच्या भव्य मंदिरात दिमाखाने विराजमान होत होता. साधारण ८००० खास निमंत्रितांची प्रत्यक्ष उपस्थिती, ५० विशेष वाद्यांचा मंत्रमुग्ध करणारा गजर, मंत्रोच्चारांचा मंगल ध्वनी, आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी आणि लाडक्या रामलल्लाचा अखंड अभिषेक, असा थाट पाहून शरयू शहारली. आसेतुहिमाचल भारतवर्षात वसलेल्या आणि सातासमुद्रापार न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरपर्यंत विखुरलेल्या श्रद्धावंतांच्या मनात तरंग उमटले. देशभरातील नागरिकांनी घरांवर ध्वज फडकावले, बाजारपेठा भगव्या पताकांनी बहरल्या, रस्ते रांगोळ्यांनी सजले. जागोजागी नागरिकांनी महाप्रसाद, मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. जणू सारा देश रामरंगी रंगून दुसरी दिवाळीच साजरी करत होता. आसमंतात केवळ रामनामाचाच हुंकार होता. ७५ वर्षांपूर्वी १५ ऑगस्टला मध्यरात्रीच्या ठोक्याला देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 'नियतीशी केलेल्या करारा'चा पुकारा करून देशाने शतकानुशतकांच्या गुलामगिरीचे जोखड फेकून दिल्याची ग्वाही दिली होती. सोमवारी दुपारच्या ठोक्याला भारतवर्षाने नव्या युगात थाटाने प्रवेश केल्याची दुदुंभी निनादली होती. देशविदेशातील भक्तांनी दूरचित्रवाणीवरील थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून हा हृद्य सोहळा मनाच्या पटलावर चिरंतन कोरून ठेवला.

मोदींचे ११ दिवसांचे अनुष्ठान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील कार्यक्रमापूर्वी ११ दिवस कठोर अनुष्ठान केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्याबद्दल मोदींचे कौतुक केले. या काळात मोदींनी उपवास, ध्यानधारणा यांच्यासह श्रीरामाच्या जीवनातील विविध प्रसंग जेथे घडले त्या ठिकाणांना भेट देऊन पुष्पांजली वाहिली. हे ११ दिवस ते जमिनीवर झोपले, झाडाच्या पानांवर अन्नग्रहण केले, तसेच गायत्री मंत्राचे पठण केले.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

अयोध्येतील अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनने सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत केले. दूरदर्शनच्या यूट्यूब वाहिनी आणि एक्स हँडलवरूनही कार्यक्रमाची क्षणचित्रे दाखवली गेली. पीव्हीआर मल्टिप्लेक्सने देशभरातील ७० प्रेक्षागृहांत कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले. देशविदेशांतील लाखो भक्तांनी हा सोहळा हृदयात साठवून ठेवला.

दिग्गजांकडून गौरवोद‌्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील कार्यक्रमाचे अभूतपूर्व असे वर्णन केले. सर्व देश राममय झाला असून आपण त्रेता युगात अवतरलो असल्याचा भास होतो आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भावना व्यक्त केल्या. आजचा दिवस खचितच ऐतिहासिक आहे, असे मत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केले, तर देश दुसरी दिवाळी साजरी करत असताना भारतात उपस्थित असल्याचा आनंद झाला, असे उद‌्गार संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी काढले.

५० वाद्यांचा गजर

अयोध्येतील कार्यक्रमावेळी विविध राज्यांची खासियत असलेल्या ५० वाद्यांद्वारे मंगल ध्वनी निर्माण करण्यात आला. वाद्यांमध्ये टाळ, मृदंग, झांजा, शंख यांच्यासह उत्तर प्रदेशची बासरी, ढोल, महाराष्ट्राची सुंदरी, पंजाबचा अल्गोझा, ओदिशाचा मार्दल, मध्य प्रदेशची संतूर, मणिपूरचा पुंग, आसामचा नगारा आणि काली, छत्तीसगडचा तंबोरा, बिहारचा पखवाज, दिल्लीची शहनाई, राजस्थानचा रवणहाथा, बंगालचा श्रीकोळ आणि सरोद, आंध्र प्रदेशचा घटम, झारखंडची सितार, गुजरातचा संतर आदींचा समावेश होता. त्यांच्या साथीला धीरगंभीर आवाजातील मंत्रोच्चारण होत होते. या सूरांनी सर्व वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.

देश-विदेशात जल्लोष

अयोध्येतील मुख्य कार्यक्रमाच्या जोडीने देश-विदेशातील शहरे आणि गावागावांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिरांमध्ये महाआरती, पूजाअर्चा, प्रसाद वाटप असे कार्यक्रम झाले. चौकाचौकांत नागरिकांनी लाऊडस्पीकरवर गाणी, नृत्य असे कार्यक्रम केले. अमेरिकेत न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेरमध्येही भारतीयांनी झेंडे फडकावत मिरवणूक काढली आणि अयोध्येतील कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले. देशभरात दुसरी दिवाळीच साजरी करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in