||रामोत्सव|| सांवळा ग रामचंद्र!

प्रभू रामचंद्राची ज्या शिळेपासून मूर्ती बनवली आहे, त्याला त्याच्या काळ्या रंगामुळे कृष्णशिळा म्हणतात.
||रामोत्सव|| सांवळा ग रामचंद्र!

अयोध्या : सांवळा ग रामचंद्र, माझ्या मांडीवर न्हातो। अष्टगंधांचा सुवास, निळ्या कमळांना येतो॥अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेल्या रामलल्लाच्या लोभस चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून गदिमांच्या गीतरामायणातील हे वर्णन केवळ दृष्टीपटलावर उभे राहिले नाही, तर बाबूजींचे स्वरही कानात घुमले. त्रेता युगातील प्रभू रामाच्या जन्माचा आनंदोत्सव सोमवारी कलीयुगात याचि देही याचि डोळा केवळ अयोध्यानगरीलाच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षाला, अगदी सातासमुद्रपलीकडे अवघ्या विश्वाला अनुभवता आला. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दुपारी १२.२० वाजता अभिषेक विधीने सुरुवात झाली. प्राणप्रतिष्ठेची मुख्य पूजा अभिजीत मुहूर्तावर करण्यात आली. रामलल्लाच्या अभिषेकाची वेळ काशीचे अभ्यासक गणेशवर शास्त्री द्रविड यांनी निश्चित केली होती. हा कार्यक्रम पौष महिन्याच्या द्वादशी तारखेला अभिजीत मुहूर्त, इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र, मेष लग्न आणि वृश्चिक नवमशामध्ये संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा तब्बल ८४ सेकंदात करण्यात आली.

या सोहळ्याच्या निमित्ताने रामलल्लाला आपल्याच जन्मभूमीत विराजमान झाल्याचे पाहण्याचे भाविकांचे स्वप्न ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पूर्ण झाले अन‌् देशभर दिवाळी साजरी झाली. अभिषेकप्रसंगी लष्कराच्या हेलिकॉप्टरने नव्याने बांधलेल्या रामजन्मभूमी मंदिरावर पुष्पवृष्टी केली. रामलल्ला सिंहासनावर विराजमान होण्याआधी अयोध्या नगरी रघुनाथाच्या स्वागतासाठी फुलांनी सजवण्यात आली होती. अद‌्भूत वास्तुकलेचे दर्शन घडवणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील सावळ्या वर्णातील रामलल्लाची बालरूपात मूर्ती डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. या मूर्तीमध्ये रामलल्ला पाच वर्षांच्या बालकाप्रमाणे लोभास भासत आहेत.

रामलल्लांचे त्यातून केवळ बालपणाचेच नव्हे तर देवत्वाचे दर्शन घडते. रामलल्लाच्या चेहऱ्यावर हास्य केवळ हृदय जिंकणारेच नाही तर प्रत्येकाच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवणारे आहे. रामलल्लाची ही ५१ इंचाची मूर्ती अतिशय सुंदर आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. यामध्ये रामलल्ला कपाळावर तिलक लावलेले दिसत आहेत. त्यांची ही प्रतिमा काळ्या रंगाच्या श्याम शिळेपासून तयार करण्यात आली आहे.

प्रभू रामचंद्राची ज्या शिळेपासून मूर्ती बनवली आहे, त्याला त्याच्या काळ्या रंगामुळे कृष्णशिळा म्हणतात. हजारो वर्षांपर्यंत या शिळेवर पाणी, चंदन इत्यादींनीही नकारात्मक प्रभाव पडत नाही. रामलल्लाच्या मूर्तीचे वजन २०० किलो आहे. तिची रुंदी तीन फूट आहे. ही मूर्ती कमळाच्या फुलावर उभी आहे. रामलल्लाच्या हातात सोन्याचे बाण आणि धनुष्यही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक पाहायला मिळाली. सोन्याचे दागिने आणि फुलांनी सजवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन होताच देशातील कोट्यवधी जनता धन्य पावली. रामलल्लाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात हिऱ्या-मोत्याचा हार लक्षवेधक होता. सोन्याच्या कानातल्यांनीही कान सजवले आहेत. रामलल्लाने पितांबर धारण केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in