रणथंबोरच्या जंगलात पर्यटकांना अंधारात सोडून गाईड गेला पळून

राजस्थानच्या सवाई माधोपुर रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांच्या सुरक्षेशी संबंधित निष्काळजीपणा उघड झाला आहे. वाघांनी अधिवास असलेल्या या जंगलाच्या मध्यभागी पर्यटकांना वाऱ्यावर सोडून गाईड पळून गेला.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
Published on

जयपूर : राजस्थानच्या सवाई माधोपुर रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांच्या सुरक्षेशी संबंधित निष्काळजीपणा उघड झाला आहे. वाघांनी अधिवास असलेल्या या जंगलाच्या मध्यभागी पर्यटकांना वाऱ्यावर सोडून गाईड पळून गेला. यामुळे भीतीच्या सावटाखाली पर्यटकांना काही वेळ अडकून राहावे लागले.

यामध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी वनविभागाने कठोर कारवाई करत गाईडसह चौघांचे निलंबन केले आहे. रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात क्रमांक-६ मध्ये सफारीदरम्यान, पर्यटकांनी भरलेला एक कॅन्टर अचानक जंगलाच्या मध्यभागी बिघडला.

या कॅन्टरमध्ये महिला आणि मुले देखील होती. कॅन्टरमध्ये उपस्थित असलेल्या गाईडने दुसरा कॅन्टर आणायला जातो, असे सांगून पर्यटकांना जंगलात सोडले. परंतु, तो परत आलाच नाही. यानंतर, संध्याकाळी ६ ते ७:३० वाजेपर्यंत पर्यटक जंगलाच्या मध्यभागी अंधारात अडकले, याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये मुले मोबाईलच्या प्रकाशात अंधारात बसलेली दिसतात आणि भीतीने रडण्याचा आवाज ऐकू येत आहे.

पर्यटकांनी सांगितले की, त्यांनी वारंवार मदतीसाठी आवाहन केले. परंतु वन विभागाकडून मदत वेळेवर पोहोचली नाही. शेवटी एक पर्यटक दुसऱ्या जिप्सीमध्ये बसला आणि राजबाग नाका चौकीत पोहोचला आणि तेथून एक वाहन घेऊन उर्वरित पर्यटकांना बाहेर काढले.

तक्रारीनंतर, वन विभागाने सुमारे अडीच तास उशिरा हेडलाइट्स नसलेला कॅन्टर पाठवला, जो चालकाने टॉर्चच्या सहाय्याने आणला.

logo
marathi.freepressjournal.in