वर्षभरात ३० वेळा दुबई ट्रिप, प्रति एक किलो सोन्याच्या स्मगलिंगसाठी रान्या रावला किती रुपये मिळायचे?

रान्या राव तस्करीसाठी विशेषरित्या बनवलेले जॅकेट्स आणि कमरेच्या पट्ट्यांचा वापर करायची. सोन्याचे बार लपवण्यासाठी ती वारंवार तेच जॅकेट्स आणि बेल्ट्स वापरत होती. अटकेच्या वेळी DRI अधिकाऱ्यांनी तिने परिधान केलेल्या विशेष जॅकेटमधूनच सोन्याचे बार हस्तगत केले.
वर्षभरात ३० वेळा दुबई ट्रिप, प्रति एक किलो सोन्याच्या स्मगलिंगसाठी रान्या रावला किती रुपये मिळायचे?
एक्स (@kamleshksingh)
Published on

कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोमवारी रात्री बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. दुबईहून सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ही कारवाई केली. १५ किलो वजनाचे सोन्याचे बार तिच्या ताब्यातून जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत १२.५६ कोटी रुपये आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून धक्कादायक खुलासे होत आहेत.

दर ट्रिपला किलोच्या हिशेबाने सोने

रान्या राव कर्नाटकमधील वरिष्ठ IPS अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ३० वेळा तिने दुबईचा प्रवास केला, प्रत्येक प्रवासात तिने किलोच्या हिशोबाने सोने भारतात आणल्याचा आरोप आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, प्रति एक किलो सोन्याच्या तस्करीसाठी तिला १ लाख रुपये मिळत होते. त्यामुळे प्रत्येक ट्रिपसाठी तिला सुमारे १२ ते १३ लाख रुपये मिळत होते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

विशेष प्रकारच्या जॅकेट आणि बेल्टचा वापर

तपासात असेही उघड झाले आहे की, रान्या राव तस्करीसाठी विशेषरित्या बनवलेले जॅकेट्स आणि कमरेच्या पट्ट्यांचा वापर करायची. सोन्याचे बार लपवण्यासाठी ती वारंवार तेच जॅकेट्स आणि बेल्ट्स वापरत होती. अटकेच्या वेळी DRI अधिकाऱ्यांनी तिने परिधान केलेल्या विशेष जॅकेटमधूनच सोन्याचे बार हस्तगत केले.

DRIच्या रडारवर होती रान्या राव

सततच्या दुबई प्रवासामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला होता. अखेर सोमवारी परत येताना DRI अधिकाऱ्यांनी तिला विमानतळावर थांबवले. त्यावेळी तिने स्वतःला IPS अधिकारी रामचंद्र राव यांची मुलगी असल्याचे सांगितले, मात्र आधीपासूनच माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली आणि सोन्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

एकूण जप्ती १७.२९ कोटी रुपयांपर्यंत

या प्रकरणात आतापर्यंत एकूण १७.२९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिच्या बंगळुरूतील घरावर छापा मारून तब्बल २.०६ कोटींचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रोख रक्कम जप्त केली आहे.

वडिलांची प्रतिक्रिया

"माझ्यासाठीही ही घटना धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी आहे. मला या प्रकरणाची कोणतीही कल्पना नव्हती. अन्य कोणत्याही पित्याप्रमाणे हे माझ्यासाठीही धक्कादायक आहे. ती आमच्यासोबत राहत नाही, ती पतीसह स्वतंत्र राहते. त्यांच्यात नक्कीच काही समस्या असाव्यात...कदाचित काही कौटुंबिक कारणे असतील. मात्र, कायदा आपले काम करेल. माझ्या कारकीर्दीवर कधीच कोणतेच काळे डाग नाहीत. मी यापेक्षा अधिक काही बोलू इच्छित नाही," अशी प्रतिक्रिया रान्याचे वडील, वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिली. तर, "चार महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला असून, त्यानंतर ती आमच्याकडे आली नाही. तिच्या किंवा तिच्या पतीच्या व्यवसायिक व्यवहारांविषयी आम्हाला कोणतीही माहिती नाही," असे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. ते कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान, रान्या एकटी तस्करी करीत होती की की दुबई आणि भारतामधील मोठ्या तस्करी नेटवर्कचा भाग आहे, याची सखोल तपासणी सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in