अखेरचा 'टाटा' ! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

रतन टाटा यांच्या जाण्याने आपल्याच घरातील व्यक्ती गेल्याचे दुःख प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटले.
अखेरचा 'टाटा' ! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती
Published on

मुंबई : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या निधनाने तळागाळाच्या माणसापासून ते सर्वे क्षेत्रातील दिग्गजांना धक्का बसला. गुरुवारी वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. रतन टाटा यांच्या जाण्याने आपल्याच घरातील व्यक्ती गेल्याचे दुःख प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटले.

बुधवारी रात्री उशिरा रतन टाटा यांचे ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेली दोन ते तीन दिवस ते आजारी होते. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशात शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर उद्योगजगतासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला.

रतन टाटा यांच्यावर गुरुवारी सायंकाळी वरळी येथील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रतन टाटा यांच्या कुटुंबातील नोएल टाटा यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय व्यापार मंत्री पियूष गोयल, राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, अभिनेता आमिर खान, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, नीता अंबानी आदी उपस्थित होते. रतन टाटा यांना निरोप देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचीही अलोट गर्दी वरळी स्मशानभूमीत झाली होती.

रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी १०.३० ते ३.५५ पर्यंत दक्षिण मुंबईतील 'एनसीपीए'त ठेवण्यात आले होते. तेथे राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारो लोकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या स्मशानभूमीत नेण्यात आले. तेथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. मुंबई पोलिसांनी त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. पारशी धर्माच्या परंपरेप्रमाणे दखमा विधीऐवजी वरळीच्या विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पारशी धर्मातील प्रथेप्रमाणे अन्य धार्मिक विधी येते तीन दिवस त्यांच्या कुलाबा येथील बंगल्यावर होणार आहेत.

राज्यात एक दिवसाचा दुखवटा

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात गुरुवारी एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला.

रतन टाटा यांना 'भारतरत्न' द्या!

राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव रतन टाटा यांना मरणोत्तर 'भारतरत्न मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्यातील महायुती सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे नाव 'भारतरत्न पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात यावे, अशी चर्चा झाली आणि नंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांच्या स्मरणार्थ शोक ठरावही मंजूर करण्यात आला.

राज्य सरकारच्या पुरस्काराला रतन टाटा यांचे नाव

राज्यात उद्योग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्याला पुढील वर्षापासून 'रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार देण्यात देणार आहे. यासोबतच नरिमन पॉइंटजवळील उद्योग भवनाला सान टाटा' यांचे नाव देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या उद्योग क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे नाव यापुढे "रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असे असणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

रतन टाटा यांचा वारसदार कोण?

रतन टाटा गेल्यानंतर त्यांचा वारसा कोण सांभाळणार हा प्रश्न आहे. एन. चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे चेअरमन आहेत, पण टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा होते. रतन टाटा यांनी मृत्यूपूर्वी टाटा ट्रस्टचा उत्तराधिकारी नियुक्त केला नाही. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे त्यांच्या कौटुंबिक संबंधांमुळे आणि समूहाच्या अनेक कंपन्यांमधील सहभागामुळे टाटांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तसेच नवल आणि सायमन टाटा यांचे सुपुत्र नोएल हे कोल्टास, टाटा इन्व्हेस्टमेंट्स आणि टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आहेत. टाटा स्टीलचे उपाध्यक्ष आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळावरही आहेत. त्यामुळे रतन टाटा यांचा वारसदार बहुधा टाटा परिवारातील असेल, असे मानले जात आहे.

दिग्गजांकडून श्रद्धांजली

दूरदर्शी उद्योग नेते- पंतप्रधान

रतन टाटा हे एक द्रष्टे उद्योगपती, दयाळू आणि विलक्षण माणूस होते, भारतातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला त्यांनी स्थिर नेतृत्व दिले, नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

देशाचे विवेकरक्षक- राज्यपाल

अनेक क्षेत्रात नीती मूल्यांशी तडजोड होत असताना देखील रतन टाटा यांनी वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात शाश्वत भारतीय नीतिमूल्यांची कसोशीने जपणूक केली. रतन टाटा हे खऱ्या अर्थान भारतीय उद्योग क्षेत्राचे विवेकरक्षक' होते, अशा शब्दात महराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

त्यांच्याकडून शिकायला मिळाले- गडकरी

रतन टाटा यांच्याशी तीन दशकांहून अधिक काळ त्यांच्याशी घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. अशा महान व्यक्तीचा साधेपणा, त्यांचा उत्स्फूर्तपणा, त्याच्यापेक्षा लहान असलेल्यांचाही आदर करणे, हे सर्व गुण मी अगदी जवळून पाहिले आणि अनुभवले, त्यांच्याकडून मला आयुष्यात खूप काही शिकायला मिळाले, अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या.

प्रेरणा देणारा विचार - आठवले

उद्योग विश्वातील भारताचे कोहिनूर, टाटा सुमूलचे प्रमुख पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशाची आणि औद्योगिक-सामाजिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. रतन टाटा हे एक व्यक्ती नसून देशवासीयांना प्रेरणा देणारा विचार होते. रतन टाटा हे साधी राहाणी आणि उच्च विचार जगलेले व्यक्तिमत्व होते, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

अनमोल रत्न गमावले- मुख्यमंत्री

निखळ मानवत्ता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ अमूल्य असे रत्न म्हणता येईल, असे बहुआयामी व्यक्तिमत्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे जगाने अनमोल रत्न गमावले आहे. भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दातृत्वाचा मानबिंदू हरपला- फडणवीस

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे. रतन टाटा यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा यांना श्रद्धांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

उद्योजक जगताचा विश्वासार्ह, चेहरा हरपला- अजित पवार

उद्योगपती रतन टाटा हे भारतीय उद्योगक्षेत्राचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा होते. टाटा उद्योगसमुहाला आंतरराष्ट्रीय उंची, सन्मान, प्रतिष्ठा, विश्वासार्हता मिळवून देताना देशाचा गौरव वाढवण्याचे काम त्यांनी केले. सचोटी, प्रामाणिकपणाने उद्योग क्षेत्रात यश मिळवता येते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवले. सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योगसमूह म्हणून टाटा उद्योग समूहाला देशभक्तीचे प्रतीक बनवण्यात ते यशस्वी ठरले, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

मदत करणारा स्वभाव स्मरणात राहील- शरद पवार

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील, असे शरद पवार यांनी सांगितले.

निःस्वार्थ योगदान - वडेट्टीवार

आपल्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला. देश संकटात असताना अनेक प्रसंगावर त्यांनी देशासाठी दिलेल्या निःस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही, त्यांचे कार्य, विचार आणि योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत म्हणून कार्य करत राहील. त्यांच्या निधनाने आपल्या देशाने सर्वात "अमूल्य रत्न" असे व्यक्त्तिमत्त्व गमावले आहे, असे सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर ट्विट करत रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

उद्योग विश्वातला दीपस्तंभ हरपला- नाना पटोले

स्वतःच्या जगण्याने आणि अलौकिक कर्तृत्वाने मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करणारे उद्योगपती व टाटा उद्योग समूहावे माजी चेअरमन रतन टाटा यांच्या निधनाने भारतीय उद्योग विश्वातील दीपस्तंभ हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

मरणोत्तर भारतरत्न द्या- राज ठाकरे

रतन टाटा यांचे माणूस म्हणून मोठेपण आणि व्यक्तिमत्त्व अफाट होते. त्यामुळे त्यांच्या हयातीतच त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवायला हवे होते. पण आता त्यांना मरणोत्तर का होईना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

एका युगाचा अंत- अमिताभ बच्चन

एका युगाचा अंत झाला आहे. एक अत्यंत आदरणीय, नम्र, परंतु अफाट दूरदृष्टी आणि संकल्पचा दूरदर्शी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत अनेक अद्‌भुत क्षण घालवले असल्याचेही त्यांनी म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in